कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी फक्त ३० मिनिटे झालेल्या पावसाने अक्षरश: थरकाप उडाला. पावसाची भयानकता इतकी होती फक्त 30 मिनिटात दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी घरांची छप्पर उद्ध्वस्त झाली, तर पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. कोल्हापूर शहरातील खानविलकर पंपानजीक झाड कोसळले. राजारामपुरी परिसरातही मुसळधार पावसाने झाड कोसळले.


सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात केली. 30 मिनिटांमध्ये पावसाने रौद्ररुप धारण केल्याने अनेक ठिकाणी वित्तहानीच्या घटना घडल्या. तुफानी वारा आणि कोसळणाऱ्या गारांमुळे काही काळ सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाने धुमाकूळ केल्याने ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहने अडकून पडली.जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून, तर काही ठिकाणी फांद्या कोसळल्याची घटना घडल्या. पावसाची भयानकता इतकी होती की, समोरील तब्बल 30 ते 40 फुटांवरील काहीच दिसून येत नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करून थांबावे लागले. 


अनेक वाहनांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अर्ध्या तासाच्या पावसाने अनेक ठिकाणी घरांची छप्पर उडून गेली. 


कोल्हापूर जिल्ह्यावर यंदाही महापुराची टांगती तलवार


गेल्या तीन वर्षांपासून सलग महापूराच्या यातना सहन करत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर (Kolhapur Rain Update) यंदाही महापुराची टांगती तलवार आहे. हवामान खात्याने दिलेल्या दुसऱ्या अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस कोसळणार आहे. 


एनडीआरएफ पथक तैनात करण्याचे आदेश 


गेल्या तीन महापुराचा कटू अनुभव लक्षात घेऊन प्रशासन अलर्टवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 15 जूनपासून एनडीआरएफ पथके तैनात करण्याचे आदेश  थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत झालेल्या मान्सूनपूर्व आढाव बैठकीनंतर हे आदेश दिले. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील पुरात बचावकार्यासाठी कोल्हापूरमधील (Kolhapur Rain Update) विस्तारित धावपट्टी तसेच नाईट लँडिंग सुविधा सुरु करा, असा प्रस्ताव पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. त्यावर निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.