Kolhapur Weather Update : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी नद्यांच्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे मे महिन्यामध्ये नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावरती 20 फूट तीन इंचावर पोहोचली आहे. त्यामुळे पंचगंगा घाट परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. 

जिल्ह्यामध्ये 13 बंधारे पाण्याखाली

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग होत नसल्याने राधानगरी धरण मे महिन्यामध्येच 50 टक्के भरलं आहे. त्यामुळे यावर्षी राधानगरी धरण पावसाचा दणका कायम राहिल्यास जून महिन्यामध्येच भरण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून राधानगरी धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे राधानगरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

दुसरीकडे पंचगंगा नदी आणि भोगावती नदीवरील बंधाऱ्यांवरील बरगे न काढल्याने राधानगरी धरणातून विसर्गही थांबवण्यात आला आहे. विसर्ग झाला नसल्याने पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, राधानगरी धरण क्षेत्र परिसरामध्ये आजही ढगाळ वातावरण आणि पावसाचे हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

शेतीची कामे खोळंबली, उन्हाळी पिके सुद्धा पाण्यात 

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सर्वदूर होत असलेल्या पावसाने शेतीची कामे पूर्ण ठप्प झाली आहेत. शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने आणि पाऊस सुद्धा उघडीप देत नसल्याने शेतांमध्ये तळी साचली आहेत. त्यामुळे रोहिणी नक्षत्र सुरु होऊनही कोणत्याही प्रकारची पेरणी होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात राधानगरी, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. दुसरीकडे, उन्हाळी हाताला पिके पाण्याने कुजली गेली आहेत. त्यामुळे भूईमूग, उन्हाळी, सूर्यफुल आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे रोहिणी नक्षत्रात कोणत्याही प्रकारची पेरणीची चिन्हे दिसत नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या