Kolhapur Weather Update: कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा इशारा देऊनही पावसाने मंगळवारी पूर्ण दिवस दडी मारली. आज (5 जुलै) सकाळपासून कोल्हापूर  शहरात ढगाळ वातावरण असूनही उष्णता जाणवत आहे. जिल्ह्यात राधानगरी आणि भुदरगड तालुका वगळता गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे मान्सूनचे उशिरा आगमन, त्यानंतर एक आठवडाभर तुरळक सरींनी लावलेल्या हजेरीनंतर पुन्हा उघडीप दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, पावसाने दडी मारली आहे.  


मंगळवारी कमाल तापमानाचा पारा 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. गेल्या 24 तासांत अवघ्या 5.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. केवळ राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांमध्येही पाण्यात संथगतीने वाढ सुरु आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या गुरुवारपर्यंत तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या काळात जिल्ह्यातील काही भागात सुमारे 100 ते 204 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता आहे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह इतर ठिकाणी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू राहिला. मोठ्या पावसाची अपेक्षा असतानाही दमदार पावसाची वाट पाहावी लागत आहे.


दरम्यान, कोल्हापूर महापालिकेने शिंगणापूर बंधाऱ्याचे बर्गे काढले नसल्याने मंगळवारी बंधारा पाण्याखाली गेला. माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना देऊन बर्गे तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, पाण्याची पातळी आणि प्रवाह जास्त असल्याने काहीच बर्गे काढण्यात आले. मात्र,  बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी बंद झाले आहे.पाणी कमी झाल्यानंतर उर्वरित बर्गे काढले जाणार आहेत. जोराचा पाऊस झाला आणि पुन्हा पाणी वाढले जाऊन बर्गे काढण्यात अडचणी येऊ शकतील. अशी परिस्थिती आहे.


इतर महत्वाच्या बातम्या