Kolhapur Weather: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित उघडले आहेत. दरम्यान, हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार असल्याने धरणांच्या पाण्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांमधून भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भोगावती नदीपात्रात एकूण 11500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कुंभी आणि वारणा धरणातून विसर्ग वाढणार
दुसरीकडे, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आजपासून सकाळी 10 वाजता वक्र द्वाराद्वारे 5000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येत आहे व विद्युतगृहातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून तो 1630 क्युसेक असून एकूण 6630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार विसर्ग सुरू करण्यात येईल. दरम्यान, कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कुंभी धरणातूनही आज वक्रद्वाराद्वारे 1000 क्युसेक व विद्युतगृहातून चालू असणारा 300 क्युसेक असा एकूण 1300 क्युसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या