कोल्हापूर : नगरपालिका मतदान तर झालं पण ऐनवेळी निकाल पुढे गेल्यानंतर आता उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना प्रशासन आणि निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच अनेक ठिकाणी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमला कार्यकर्त्यांनी जागता पहारा देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. कोल्हापुरातील पेठवडगाव या ठिकाणी तर ईव्हीएममध्ये काही घोळ होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क स्वखर्चाने सीसीटीव्ही लावले होते. पण प्रशासनाने मात्र ते सीसीटीव्ही काढून टाकले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.
पेठवडगाव नगरपरिषदेसाठी यादव आघाडी आणि जनसुराज्य-ताराराणी आघाडी एकमेकांसमोर उभ्या आहेत. 21 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झालं आणि सर्व ईव्हीएम मशिन नगरपालिकेच्या मराठा समाज हॉलमध्ये बंदिस्त करण्यात आले. परंतु विरोधी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रशासनावर कोणताही विश्वास नसल्याने त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्ट्राँग रुमबाहेर सीसीटीव्ही लावले. पण प्रशासनाने मात्र ते काढून टाकल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
Vadgaon Municipal Council Election : तक्रार आल्याचं कारण सांगत कारवाई
स्ट्राँग रुमच्या आतमध्ये नगरपालिकेने सीसीटीव्ही लावले आहेत. पण बाहेरच्या बाजूने सुरक्षेसंबंधी सीसीटीव्ही लावण्यात आले नाहीत. त्यामुळे ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनीच मुख्य रस्त्याच्या बाहेर सीसीटीव्ही लावले. कार्यकर्त्यांनी लावलेले हे सीसीटीव्ही खासगी जागेत आहेत. परंतु तरीही नगरपरिषद प्रशासनाने आणि पोलिसांनी ते काढून टाकले.
बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीसंदर्भात काहीजणांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई केल्याचं नगरपरिषद प्रशासनाने सांगितलं. पण ही तक्रार कुणी केली आणि त्याची लेखी प्रत आहे का यावर मात्र प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही.
Vadgaon Election : नियमानुसार कारवाई, मुख्याधिकाऱ्यांचा दावा
या संबंधी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमीत जाधव म्हणाले की, "सुरक्षेच्या दृष्टीने आपण या आधीच आठ कॅमेरे लावलेले आहेत. त्यासंबंधीचे पत्र प्रत्येक उमेदवाराला देण्यात आलं आहे. त्याची स्क्रीन बाहेर लावण्यात आली आहे. खासगी जागेत लावलेल्या सीसीटीव्ही संदर्भात तक्रार आली आहे. त्यामुळे हा निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप ठरतोय. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे. जर उद्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण?"
नगरपरिषदेने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या केलेल्या आहेत. उमेदवाराने सीसीटीव्ही लावण्यासंबंधी कोणतीही तरतूद नाही. आयोगाच्या सूचना आहेत त्या प्रमाणे आम्ही कारवाई केली आहे असं मुख्याधिकारी सुमीत जाधव यांनी सांगितलं.
तर नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप पाटील म्हणाले की, "प्रशासनाने स्ट्राँग रुमच्या आतमध्ये कॅमेरे लावले आहेत. तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही घोळ होऊ नये, त्यावर शंका उपस्थित होऊ नये यासाठी काही कार्यकर्त्यांनी बाहेर खासगी जागेवर सीसीटीव्ही लावले आहेत. परंतु प्रशासनाने हे सीसीटीव्ही काढण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हे सीसीटीव्ही काढले. बाहेर खासगी जागेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीवर कुणी तक्रार केली याची माहिती प्रशासन देत नाही. तसेच ती तक्रार असेल तर त्याची लेखी प्रतही द्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत प्रशासनाने सीसीटीव्ही काढल्याने शंकेला वाव आहे. त्यामुळे स्ट्राँग रुमच्या बाहेर एक मोठी स्क्रीन लावावी आणि नागरिकांना प्रत्येक अपडेट द्यावी अशी आमची मागणी आहे."
ही बातमी वाचा: