Belgaum News: कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आज (8 डिसेंबर) बेळगावात सुरूवात होत असताना सीमाभागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी भाषिकांच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्याची मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच जोरदारपणे व्यक्त केली जाते. परंतु या मागण्यांना थोपवण्यासाठी कर्नाटक सरकारकडून मुस्कटदाबी सुरु आहे. खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक नेत्यांना पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आले.

Continues below advertisement

मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली

सीमाभागातील मराठी जनतेची मागणी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारपुढे मांडण्यासाठी दरवर्षी बेळगावात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जातो. हा महामेळावा मराठी ओळख, हक्क आणि न्यायासाठीचा संघर्ष जिवंत ठेवणारा महत्वपूर्ण मंच मानला जातो. यंदाही मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव यात सहभागी होणार होते. मात्र, संभाव्य विरोध आणि मोठ्या प्रमाणातील उपस्थितीची धास्ती घेत कर्नाटक सरकारने या महामेळाव्याला परवानगी नाकारली. त्यापाठोपाठ मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करून आंदोलने रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कोल्हापुरात ठाकरे गटाने बसेस रोखल्या

कर्नाटक सरकारची ही भूमिका केवळ स्थानिक मराठी जनतेतच नव्हे तर महाराष्ट्रातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तर थेट रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. कोल्हापूर एसटी स्टँड येथे कर्नाटक परिवहनच्या बस अडवून आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध करत मराठी जनतेच्या आंदोलनाला मुस्कटदाबीचा करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Continues below advertisement

सुवर्णसौधभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पृष्ठभूमीवर सुवर्ण सौधभोवती 20 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू केला आहे. दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे पोलिसांनी सतर्कतेसाठी सुवर्णसौधभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून कडक बंदोबस्त ठेवला आहे. 2012 ते 2024 या काळात हिवाळी अधिवेशनात अनुचित घटनांचे 27 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 73 पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि 21 लोक जखमी झाले आहेत. 6 लाख 23 हजार रुपयांच्या सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, यावेळी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. दहा दिवसांच्या अधिवेशनकाळात पोलिस विभागाची परवानगी आहे, त्यांनाच आंदोलन करता येणार आहे. एकीकडे, बागलकोटमध्ये ऊस आणि मका उत्पादक शेतकर्‍यांकडून निषेध होत आहे आणि अधिवेशन एकाचवेळी सुरु असल्याने, शेतकरी घेराव घालण्याची शक्यता आहे. या कारणास्तव, सुवर्णसौधभोवती पाचपेक्षा जास्त लोकांच्या गटांना जमण्याची परवानगी नाही. कोणतीही शस्त्रे, प्राणघातक शस्त्रे किंवा काठ्या घेऊन जाण्यास परवानगी नाही. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून निषेध करण्यास परवानगी नाही. विविध 10 अटींसह प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या