कोल्हापूर : आपण साधे कार्यकर्ते आहोत आपण एका विशिष्ट हेतूने एकत्र आलो आहोत. 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन बाजूला आलो, अशा वेळी तुम्ही आम्हाला सामावून घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसात दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे. मात्र, कितपत प्रक्रिया असावी याला देखील मर्यादा आहेत. लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला, यामुळे ही जागा आपण हरल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी दिली. 


त्यांची लायकी काय आहे मला माहित आहे


दरम्यान, कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी (Kolhapur Uttar Vidhan Sabha) प्रयत्नशील असल्याचे म्हटले होते. उपनेते संजय पवार या मतदारसंघातून इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले की, पक्षाचे सचिव अडीच वर्षांपूर्वी आले होते. त्यावेळी मी त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन सांगितलं होतं की तुम्ही पुढचे खासदार नाही. त्यांची लायकी काय आहे मला माहित आहे. उद्धव ठाकरे यांच्या कानात फुकणाऱ्या या कान फुकरांमुळे पक्ष संपला. 


यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही


ते पुढे म्हणाले की, जे मोठे नेते आहेत, आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. ज्यांनी आमदार असताना देखील 50-100 गुन्हे घेऊन पक्षासाठी काम करणारे का सोडून जातात? याचा विचार त्यांनी करावा. ते येथे आले तेव्हा त्यांच्यासोबत 50 कार्यकर्ते सुद्धा नव्हते म्हणजे यांची काय लायकी आहे. माझ्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्यांचा देखील खरा चेहरा वर्तमानपत्राने दाखवला आहे. हजार आणि पाच हजारची पाकीटे घेऊन आंदोलन करणारे हे नेते आहेत यांना कोण मतदान देणार? समोर कोणीही येऊ दे धनुष्यबाण सक्षम आहे. यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. 


महायुतीच्या दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये यासाठी आमचा प्रयत्न


कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर बोलताना क्षीरसागर म्हणाले की 1989 पासून शिवसेना उत्तर मधून विधानसभा निवडणूक लढवत आहे आणि लोकसभा देखील लढवत आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेला संधी मिळाली तेव्हा मोठ्या प्रमाणात मते मिळाले आहे आणि 2 वेळा भाजपला संधी मिळाली मात्र त्यांना उत्तर बदलून निवडून येता आलेलं नाही. त्यामुळ वरिष्ठ निर्णय घेतील महायुतीच्या दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये यासाठी आमचा प्रयत्न असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीने टीका झाली म्हणजे उमेदवाराला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी  स्थानिक भाजप नेत्यांवर केला. जे काही डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे तो वरिष्ठ पातळीवर नाही तर स्थानिक पातळीवर होत आहे, स्थानिक पातळीवर असं होत असेल तर स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाने संयम ठेवायला हवा, असे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या