कोल्हापूर : प्रशासनाने विमानतळ परिसरातील रस्ता बंद केल्याने त्रस्त झालेल्या तामगावच्या ग्रामस्थांचा संतापाचा अक्षरशः उद्रेक पाहायला मिळाला. विमानतळाच्या मुख्य गेटवर धडक देत ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन छेडलं. पर्यायी रस्ता न देता विमानतळ प्रशासनाने बांधलेली भिंत ताबडतोब हटवण्याची मागणी या आंदोलकांनी केली. पण या आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका बसल्याचं दिसून आलं.
कोल्हापूर विमानतळाच्या मुख्य गेटवर आज तामगाव ग्रामस्थांचा संताप अक्षरशः उफाळून आला. रस्ता बंद झाल्यामुळे 20-25 किमीचा वळसा घालावा लागतो. त्यामध्ये सर्वाधिक त्रास विद्यार्थ्यांना होतो. त्यात प्रशासनाकडून संवादाचा अभाव असल्याने यावर तोडगा निघत नव्हता.
या सगळ्यामुळे त्रासाला सामोरं जावं लागणाऱ्या तामगावच्या गावकऱ्यांनी थेट कोल्हापूर एअर पोर्ट गाठलं आणि विमानतळ ऑफिसकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या आंदोलकांना विमानतळाच्या गेटवर अडवून धरले. यावेळी आंदोलकांचा संताप पाहायला मिळाला. पोलीस आणि आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
Kolhapur Tamgaon Protest : विमानतळ प्रशासनाने भिंत बांधली
विमानतळ विस्तारात हा रस्ता विमानतळाच्या हद्दीत गेला. पण पर्यायी रस्ता न देता विमानतळ प्रशासनाने भिंत उभी केली आणि रस्ता संपूर्ण बंद झाला. यामुळे तामगावकर गेल्या दीड वर्षापासून हैराण झाले आहेत. आता ग्रामस्थांचा आक्रोश एवढा वाढला की त्यांनी विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रस्ताच ठेवला नाही. त्यामुळे विमानाने आलेल्या आणि विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
तामगाव ग्रामस्थांनी एअरपोर्ट शेजारील रस्ता खुला करून द्यावा, किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वारंवार केली. तशा प्रकारचे निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांना देखील दिले. तरी देखील याकडे लक्ष न दिल्याने आज आंदोलन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.
Kolhapur Airport News : जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक ठरली
पोलिसांना हे आंदोलन होणार याची माहिती होती, पण त्याची तीव्रता इतकी असेल याचा अंदाज त्यांना देखील आला नाही. त्यामुळे एअरपोर्टकडे जाणारा रस्ता एक तास अडवून होता. पण नंतर पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर आंदोलकांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक ठरली आणि आंदोलक शांत झाले.
तामगावच्या ग्रामस्थांचा प्रशासनाबरोबर पुन्हा संवाद सुरू झाला आहे. या संवादातून तामगावच्या ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी अपेक्षा आहे. पण हा प्रश्न मिटला नाही तर तामगावकराचा प्रश्न अधिकच तीव्र होणार असल्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: