Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळ परिसरातील रस्ता खुला करण्यासाठी तामगावचे ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत विमानतळाच्या गेटवर धडक मारत आंदोलन केले. पर्यायी रस्ता करून दिला नाही, तर भिंत पाडून टाकण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण झाले त्यावेळी रस्ता विमानतळाच्या हद्दीमध्ये आला. विमानतळ प्रशासनाने हा रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवला आहे. कुठलाही पर्यायी रस्ता न देता ही भिंत बांधलेली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना तब्बल 20-25 किमीचा वळसा घालावा लागत असल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची मोठी पायपीठ सुरु आहे. प्रशासनाकडून या गावकऱ्यांसोबत कोणीही चर्चा केली नसल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले.
वैमानिकांची गाडी अडवून ठेवली
रस्ता बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत आहे. लहान मुलांना शाळेला जाण्याला त्रास होत असून मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंदोलकांनी विमानतळाच्या गेटवर धडक दिल्यानंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी विमानतळाचा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये अडवता येणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, गावकऱ्यांनी बॅरिकेड तोडून विमानतळाच्या गेटवर पोहोचले. आंदोलकांनी विमानतळावर ये-जा करणाऱ्या वैमानिकांची गाडी देखील अडवून ठेवली. इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहतील याचा अंदाज पोलिसांना देखील आला नव्हता. पोलिसांनी निवेदनाच्या माध्यमातून आंदोलकांचे म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचवू अशी भूमिका घेऊन आंदोलन न करण्याची विनंती करत आहेत, मात्र आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते.
जोपर्यंत पर्यायी रस्ता देत नाही तोपर्यंत हा रस्ता देखील सुरू करावा, आमचा चालू रस्ता चालू झालाच पाहिजे, विमानतळ प्रशासनाने बांधलेली भिंत तातडीने काढून घ्यावी, कारण कुठलाही पर्यायी रस्ता न देता ही भिंत बांधली असल्याचे गावकरी म्हणाले. त्यांनी जर नाही ऐकलं तर आम्ही बांधलेली भिंत पाडणार आहे, असा गर्भित इशारा दिला. जर तुम्ही आमचा रस्ता अडवत असाल तर आम्ही देखील तुमचा रस्ता अडवू, असा इशाराही दिला.
इतर महत्वाच्या बातम्या