Startup : कोल्हापूर जिल्ह्यातील स्टार्ट अप विजेत्या सोहिली पाटील व डॉ.स्नेहल माळी यांच्या नवकल्पनेसाठी राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महिला नवउद्योजिका पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.


शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्टार्टअप सप्ताह आणि स्टार्टअप यात्रेतील विजेत्यांना आज राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी़ डॉ. रामास्वामी एन. आदी मान्यवर उपस्थित होते.


जिल्हा स्तरावरील विजेत्यामधून राज्यस्तरावर प्रत्येक क्षेत्रातील प्रथम व द्वितीय तसेच प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट महिला अशी एकूण 21 पारितोषिके राजभवन, मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यामधून निवड झालेल्या सोहिली पाटील व डॉ.स्नेहल माळी यांची राज्यस्तरावरून सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. सोहिली पाटील यांनी आहार किंवा डोस देताना अस्वस्थता आणि लहान मुलांसाठी एक स्मार्ट आरामदायी प्लॅटफॉर्म तयार केला आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून स्टार्टअप व नाविन्यता यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र व  नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण स्पर्धा दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ येथे पार पडले.  शिबिराच्या दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या  सहभागी नवउद्योजक तसेच उमेदवारांच्या सादरीकरणाचे  कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन,स्वच्छ पाणी,उर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा व गतिशीलता आणि  इतर अशा सात क्षेत्रनिहाय त्या त्या क्षेत्रातील पारंगत ज्युरीद्वारे परिक्षण करण्यात आले. याकरिता जिल्ह्यामधून १०३ उमेदवारांनी msins.in या पोर्टलवर त्यांच्या नवकल्पनांची नोंदणी केली होती, त्यापैकी ६० उमेदवारांनी त्यांच्या नवकल्पनांचे सादरीकरण केले.


जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक श्रीमती सोहिली पाटील (आरोग्य), द्वितीय क्रमांक श्री. विकास बोडके (पूर व्यवस्थापन) तर तृतीय क्रमांक श्री. धनंजय वडेर (रानादा थंडाई) यांच्या नवकल्पनांना देण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या  मानव्यविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.एस.देशमुख यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. आण्णासाहेब गुरव, तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रा. डॉ. एस.एन.सपली, प्रा. हर्षवर्धन पंडीत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.डी.राऊत, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर, सहायक आयुक्त सं. कृ. माळी, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, श्रीमती रजनी मोटे जिल्हा कौशल्य विकास समन्वयक व  प्रा. अजय कोंगे, संजय घोडावत विद्यापीठ उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या