MSRTC : दिवाळी सणाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कोल्हापूर विभागाने येत्या शनिवारपासून पुणे, मुंबई, सोलापूर आणि कोकण मार्गावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी तसेच जाणाऱ्यांसाठी मोठी सोय होणार आहे.


दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुण्यासाठी 70 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. सोलापूर आणि कोकणसाठी 30 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमएसआरटीसीचे विभागीय वाहतूक नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून, साथीच्या रोगामुळे आणि एमएसआरटीसी कर्मचार्‍यांच्या संपामुळे लोकांना दिवाळीसाठी त्यांच्या प्रवासाचे नियोजन रद्द करावे लागले. यंदा सणासुदीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार एमएसआरटीसीने या कालावधीत बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 


येत्या शनिवारपासून कोल्हापूर-पुणे मार्गावर आणखी 70 बसेस धावणार असून, कोल्हापूर विभागातील 12 आगारांतून सोलापूर, पंढरपूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सुमारे 30 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी प्रवाशांना दिवाळीच्या काळात प्रवास करताना काही गैरसोय झाल्यास किंवा तक्रारी असल्यास एमएसआरटीसी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.  एमएसआरटीसी विभागाच्या 8999803595 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधता येईल. rto.09-mh@mah वर तक्रार नोंदवता येईल. तसेच dycomment@gmail' वर परिवहन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनाही संपर्क साधता येईल. 


सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई


दरम्यान, सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची अक्षरश: लूट करणाऱ्या खासगी वाहनांना चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांनी आदेश काढला आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारून लूट करत असल्यास तक्रार नोंदवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून व्हॉटस्ॲप क्रमांकही जारी करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त तिकीट दर घेता येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.


गर्दीच्या हंगामात प्रवास करताना प्रवाशांना अडचण आल्यास याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 8999803595 या व्हॉट्सॲप क्रमांकावर व rto.09-mh@mah.gov.in या ई-मेल आयडीवर तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या dycomment@gmail.com या ई-मेल आयडीवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केलं आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या