Kolhapur Shivsena : शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर नेत्यांची कोलांटउड्या इकडून तिकडे सुरु असल्या, तरी निष्ठावंत शिवसैनिक मात्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे. सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे. 


मातोश्रीवरील शब्द शिरसावंद्य मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा शिवसैनिक शिवसेनेत चाललेल्या घडामोडीत चांगलाच भेदरून गेला आहे. गेलेल्या अनेक सत्तापिपासू नेत्यांवर ते संतापही व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नेते गोळा करण्यासाठी जाळे फेकले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांशी बैठकांचा धडाका लावला आहे. ते सातत्याने दिलासा देत आहेत.  


उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र त्या शिवसैनिकाने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना दिलं आहे. त्यामुळे या शिवसैनिकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 


खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने अखेर शिंदे गटात 


संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे बंडाळी करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा रंगली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. संजय मंडलिक यांनी शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर सातत्याने शिवसेनेसोबत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची आतून शिंदे गटाकडे त्यांचे कट्टर समर्थक बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून बोलणी सुरु होती. मतदारसंघातील आडाखा पाहून 2024 मध्ये भाजपच्या वळचणीने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी बंड केल्याचे स्पष्ट झाले आहे.


धैर्यशील माने यांनीही मतदारसंघात ऑडिओ क्लीप व्हायरल होईल याची व्यूहरचना करत शिंदे गटात जाण्याचे जवळपास निश्चित केले होते. 


कितीही बंदोबस्त लावला, तरी राजकीय वचपा काढणारच!


दुसरीकडे संजय मंडलिक (sanjay mandlik) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी या दोन्ही खासदारांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. 


खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील घराला तगडा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यावरून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक हर्षल सुर्वे यांनी घरासमोर कितीही बंदोबस्त लावला, तरी शिवसैनिक याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या