Jayant Patil on Anil Deshmukh Bail : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित 100 कोटी वसूली प्रकरणात तब्बल 11 महिन्यांनी ईडीकडून जामीन मिळाला आहे. अनिल देशमुखांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आनंद व्यक्त करतानाच खोचक टीकाही केली आहे. जयंत पाटील यांनी देशमुखांच्या जामीनावर बोलताना खोचक टिप्पणी केली. गुन्हा सिद्ध न होता तुरुंगात जावं लागतं हे केवळ भारतातच होऊ शकतं, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, अटक करायचच असं ठरवून अनिल कारवाई करण्यात आली.  


जयंत पाटील पुढे म्हणाले, अनिल देशमुख यांना जामीन मिळाला याचा आनंद आहे. सीबीआयचा देखील लवकरच जामीन होईल. आणखी नवीन कोणते आरोप करून दुसऱ्या गुन्ह्यात अडकवू नये म्हणजे झालं. 40 वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना अशा पद्धतीने मानहानी होत असल्याचे त्यांनी सांगितले.


अनिल देशमुखांना जामीन मिळाला, पण सुटकेचं काय?


दरम्यान, तब्बल 11 महिन्यांनी अनिल देशमुखांना जामीन मिळाला असला, तरी त्यांची तुरुंगातून सुटका लगेच होणार नाही. सीबीआयकडूनही त्यांच्यावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. दोन नोव्हेंबर 2021 रोजी अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. मार्च 2021 मध्ये त्यांच्यावर 100 कोटी रुपये वसूलीचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यामुळे त्यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. 


अनिल देशमुखांमार्फत कोर्टात वारंवार काय युक्तीवाद?


पीएमएलए न्यायालयाने 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. प्रकृती अस्वस्थाचं कारण दिलं होतं. तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे करण्यात आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या