Prashant Koratkar Threat Case : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर गरळ ओकून फरार झालेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर फैसला उद्या होणार आहे. कोरटकरच्या अंतरिम जामीनावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला. न्यायालयाने उद्यापर्यंत (18 मे) निर्णय राखीव ठेवला आहे. यावेळी फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे वकिल असीम सरोदे आणि सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी जोरदार युक्तीवाद केला. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे असे सांगत माझा आवाज नाही म्हणत गुन्हा दाखल होताच फरार झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीसाठी संशयित आरोपी प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग आणि फिर्यादी इंद्रजित सांवत यांचे वकील असीम सरोदे आणि सरकारी वकील विवेक शुक्ल उपस्थित होते. 


काहीही बोलण्याचा अधिकार आहे का?  


सरकारी वकील विवेक शुक्ल म्हणाले की, छत्रपती शिवराय यांच्याबाबत त्याला काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? एका केसचा संदर्भ देवून त्याला जामीन द्यावे असं त्याचे वकील म्हणतात. मात्र, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. संभाजीराजे अय्याशी होते, बाजीप्रभु देशपांडे नसते तर शिवाजी महाराज नसते असं आरोपी म्हणतो. असं वक्तव्य करणाऱ्या वक्तीला आपण संरक्षण आपण देतोय का?? मोबाईल जमा करताना फॉरमॅट करून दिला आहे. केरळा केसचा संदर्भ देत अंतरिम जामीन नामंजूर करावे असंही त्यांनी सांगितले. तो अशा पद्धतीचा गुन्हा पुन्हा करणार नाही याची शाश्वती काय? संशयिताने जी धमकी दिली आहे ते ती प्रत्यक्षात करणार नाही कशावरून? असाही सवाल त्यांनी केला. ही केस किती गंभीर आहे हे पोलिसांना ठरवून द्या. अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील हस्तक्षेप केला आहे. आरोपी तपासात सहकार्य करणार असल्याचं सांगत जमीन मंजूर करा अशी विनंती केली जात आहे. मात्र, माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दखल झाल्या नंतर पसार झाला. मोबाईल जमा करताना ही तो फॉरमॅट केला. फक्त ऑडिओ क्लिप एवढं हे मर्यादित नाही त्याच्या इन्स्टा पेजवर काही आक्षपार्ह लिखाण आहे. तपास अजून पूर्ण झालेला नाही तपासाची सुरवात आता झाली आहे.  त्यामुळे आरोपीचा जमीन अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. 


कोरटकरने शासनाचा देखील अपमान केला 


जुना राजवाडा पोलीसांनी सांगितले की, कोरटकरचा फोन हॅक झाला नाही, त्याने कधी समोर येऊन फोन हॅक झाल्याचं सांगितलं नाही. कोरटकर याच्याच फोनवरून कॉल करण्यात आला होता. कोरटकरने शासनाबाबत देखील वक्तव्य केले आहे. कोरटकरने शासनाचा देखील अपमान केला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 


कोणताच ब्राम्हण म्हणत नाही हे ब्राम्हणाचं सरकार आहे


फिर्यादीचे वकिल असीम सरोदे म्हणाले की, कोरटकर यांना असा कोणता राग आला आणि त्यांनी असं बोलले? कोणताच ब्राम्हण म्हणत नाही हे ब्राम्हणाचं सरकार आहे. इंद्रजित सावंत यांचा असा कोणता व्हिडीओ आहे ज्याचा राग कोरटकर यांना आला? आणि त्यांनी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास फोन केला.  यावेळी सरोदे यांनी कोरटकर जे बोलले शिव्या वगळून वाचून दाखवले. ब्राम्हणाबद्दल काय बोलले ते समजलं पाहिजे यासाठी प्रशांत कोरटकर समोर आले पाहिजेत. इंद्रजित सावंत ब्राम्हणांबद्दल बोलले असतील तर सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. प्रशांत कोरटकर हे पळून गेले आहेत प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे चारित्र्यहणन केलं आहे. एखाद्याचा मुद्दा मान्य झाला नाही तर त्याला तुम्ही विरोध करू शकता. इंद्रजीत सावंत यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर कोरटकर यांनी पोलिसांसमोर येऊन सांगितलं पाहिजे यामुळे भावना दुखावल्या आहेत. 


माझा मोबाईल हॅक झाला असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो, मग तो कधी हॅक झाला होता? मोबाईल हॅक झाल्याची तारीख आणि संभाषण यात तफावत आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 241 कलम पोलिसांनी लावलं पाहिजे अशी विनंती आहे. या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर ब्राम्हण आणि मराठा समाजाचा अवमान केला असल्याचे ते म्हणाले. 


मी माझ्या आवाजाचा नमुना देण्यास तयार 


दरम्यान, प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग म्हणाले की, फिर्यादी यांनी फोन झाल्यानंतर पोलीस ठाण्यात न जाता आधी अर्धवट ऑडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. संध्याकाळी 5.45 वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. खरं तर त्यांनी सर्वात आधी पोलिसांकडे जायला पाहिजे होतं. आम्ही तपासकामी मदत केली आहे. फोन देखील तपास कामी जमा केले आहेत. जी कलमं लावली आहेत, त्यांना 7 वर्षे खालील शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, कोरटकरनेमी माझ्या आवाजाचा नमुना देण्यास तयार असल्याचे वकिलातर्फे कोर्टात सांगितलं. मात्र कायदा व सुव्यवस्था आणि माध्यमांमुळे मला अडचणी निर्माण होऊ शकतात. मी तपासास पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असा कलम लावलं गेलं. जामीन अर्ज रद्द करण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आलेली कारणं खूप गंभीर आहेत. मोबाईलमधील डेटा ईरेज केलेला नाही.. जो आयफोन वापरला जात होता तो आधीच जमा केला आहे. अटक झाली नाही तर दोन समाजात तेढ निर्माण होईल अस पोलीस कसं म्हणू शकतात? अशी विचारणा कोरटकरच्या वकिलांनी केली.