मुंबई : राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असणारी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे आणि योजनेप्रमाणे पात्र असणारे शेतकरी तांत्रिक कारणाने या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर (Radhanagari Shivsena Prakash Abitkar) यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotirao Phule Loan Waiver Scheme) जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 99 हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता.
आज अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (KDC), राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांचे 1,69,467 लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून 608 कोटी इतक्या रक्कमेचा लाभ प्राप्त झाला आहे. उर्वरीत 64 हजार हून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळणे प्रलंबित असून शासकीय नोकर, इन्कमटॅक्स भरणारे व आर्थिक सक्षक असे 21,556 लाभार्थीचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा कष्टाळू आणि प्रामाणिक असून या शेतकऱ्यांमार्फत वेळेत कर्जाची परतफेड केली जाते. यामुळे कोल्हापूर जिल्हा हा कर्ज परतफेडीमध्ये राज्यात आग्रेसर आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची बिले ही वेळत जमा होत नाहीत. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक वर्ष हे 30 जूनपर्यंत आहे. या योजनेमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी के.डी.सी.सी. बँकेमध्ये खाते असणारे शेतकरी आपल्या कर्जाची परत फेड 30 जून पर्यंत करत असतो. यामुळे के.डी.सी.सी. बँकेतील शेतकऱ्यांची कर्जपरतफेड ही दोन वर्षामध्ये दिसत असून यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहत असल्याचं दिसून येतंय. या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून या योजनेचा लाभ देणे गरजेचे असून त्यांना लाभ द्यावा अशी विनंती आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.
ही बातमी वाचा: