कोल्हापूर:  सत्तेचा वापर हा विरोधकांना नामोहराम करण्यासाठी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये एका नेत्याच्या घरी ईडी, आयकर विभागाने धाडी मारल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवं तर गोळ्या मारा पण असा छळ नको असे बोलण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्या घरच्या नेत्यांना हे धाडस दाखवता आलं नाही आणि ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना नाव न घेता टोला लगावला. कोल्हापुरातील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सत्तेचा गैरवापर कुणी केला, तरुणांना कुणी बिघडवल? हे सगळं आपण बदलू. मोदींच्या हातातून सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचेही पवार यांनी म्हटले. 


अनिल देशमुख, संजय राऊत यांचे कौतुक...मुश्रीफांना फटकारले


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात बंड झाल्यानंतर शरद पवार यांची ही कोल्हापुरातील पहिलीच सभा होती. या सभेत शरद पवार यांनी बंडखोर नेत्यांना फटकारताना भाजपवरही तोफ डागली. पवार यांनी म्हटले की, अनिल देशमुख स्वच्छ भूमिका घेत होते. त्यांनी तडजोड करणार नसल्याची भूमिका घेतली. पण केवळ त्रास देण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले असल्याचे पवार यांनी म्हटले. सामनाचे संपादक संजय राऊत हे भाजपवर टीका करत असतात. त्यांनाही लिखाण बंद करण्याची धमकी दिली. त्यांनी जुमानल नाही तर त्यांनाही तुरुंगात टाकलं. नवाब मलिक यांना देखील तुरुंगात टाकलं. भाजपला वाटलं आम्ही या सगळ्याला घाबरतो. मला ईडीची नोटीस आली होती. मी म्हटलं उद्या नाही तर आता येतो म्हटलं. सगळे पोलीस अधिकारी घरात येऊन बसले आणि येऊ नका म्हणाले. असे प्रत्येकाने वागले पाहिजे. आपण काही केलं नाही तर घाबरून जाऊ नये असे पवार यांनी म्हटले. 


अजित पवार गटात असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना पवार यांनी म्हटले की, कोल्हापूर ही शुरांची भूमी आहे. काही दिवसांपूर्वी काहींना ईडीची नोटीस आली. पण मला वाटलं ते ईडीला सामोरे जातील. घरातील भगिनींनी सांगितले की आम्हाला गोळ्या घाल्या. पण त्या कुटुंबातील प्रामुख्याने तसं म्हटलेलं ऐकलं नाही. जी भूमिका त्या घरातील भगिनीने घेतली ती त्या प्रमुख नेत्याने घेतली नाही. भाजपसोबत सत्तेत बसले असल्याचे पवार यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांचा असा अपमान कोणी केला नाही 


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. सरकार शेतमालाला भाव देत नाहीत. शेतमालाला किंमत नाही आणि बँकांचा कर्ज वसुलीसाठी तगादा लावला असल्याचे त्यांनी म्हटले. कांद्यांवर कर लावल्याने शेतकरी अडचणीत आला. मी कृषीमंत्री असताना कांद्यावर कर लावला नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे पवार यांनी म्हटले. दिल्लीच्या सीमेवर 12 महिने शेतकरी बसले होते. मात्र, या 12 महिन्यात मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचा एवढा मोठा अपमान आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारने केला नाही, असेही पवार यांनी म्हटले.