कोल्हापूर: 'जलवा रे जलवा' म्हणत रीलच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या फाळकुट दादाचा रुबाब कोल्हापूर पोलिसांनी चांगलाच उतरवला आहे. पोलिसांचा प्रसाद मिळताच हात जोडून माफी मागायची वेळ त्याच्यावर आली आहे. कोल्हापूरच्या टिंबर मार्केट परिसरातील रोहित जाधव (Rohit Jadhav) याने अश्लील शब्द वापरत रिल्स केले होते. 'ए मला बघून फिरु नको तू थाटात, नाहीतर *#% मारून फेकेन पंचगंगेच्या घाटात', असे वाक्य त्याने रिलमध्ये (Instagram Reels) म्हटले होते. यातून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.


यानंतर कोल्हापूर पोलिसांनी रोहित जाधव उर्फ फाळकुटदादाला व्यवस्थित समज दिली. त्यामुळे त्याने आता इन्स्टाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर इन्स्टावर अशा पद्धतीने रिल्स करणाऱ्यांनाही त्याने सावधानतेचा सल्ला दिला आहे. अश्लील भाषा वापरून रिल्स करणाऱ्यांनो कोल्हापूर पोलीस व्यवस्थित समजावून सांगतात, मला देखील त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही अश्लील शब्द वापरून दहशत निर्माण होईल असे रिल्स करू नका. यापुढे देखील कोल्हापूरमध्ये अश्लील शब्द वापरून दहशत निर्माण करण्याचा करणारे रिल्स आढळून आल्यास पोलीस त्यांच्यावर देखील अशाच पद्धतीने कारवाई करणार आहेत.


पोलिसांना भेटल्यानंतर फाळकुट भाईची भाषाच बदलली


फाळकुटदादाचा हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी फाळकुट दादाला व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर फाळकुट दादाची भाषाच बदलली. त्याने पोलीस ठाण्यातूनच आणखी एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. यामध्ये त्याने म्हटले की,माझं नाव रोहित जाधव. मी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती. भावांनो असं काही करु नका तुम्ही. मला राजवाडा पोलीस ठाण्यात घेऊन आलेत. मला पोलिसांनी प्रेमाने समजावून सांगितलं, असं काही करु नको. भावांनो तुम्हीही असं काही करु नका. काही केलं तर राजवाडा पोलीस स्टेशन तुम्हाला प्रेमाने समजावून सांगतील. 


आणखी वाचा



रात्री 10 नंतर इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास मेसेज; काय असेल हा मेसेज?