कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत (Kolhapur Ganesh Darshan) कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Police) तिन्ही मार्गांवर करडी नजर ठेवली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून मुख्य विसर्जन मार्गासह, समांतर तसेच पर्यायी मार्गावर तब्बल 76  ठिकाणी सीसीटीव्ही तैनात करून विसर्जन मार्गावर करडी नजर ठेवली आहे. कोल्हापुरात सकाळी नऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. पंचगंगा घाटावर एकही गणपती विसर्जनासाठी जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.


मध्यरात्री 12 नंतर साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी 


दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत आज मध्यरात्री 12 नंतर साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी असणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर सन्नाटा असेल. नियमाचे उल्लंघन झाल्यास  गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमावलीनुसार गणेशोत्सवात पहिल्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी सकाळी 6 ते 12 बारापर्यंत नियमात सिस्टीम आणि पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी आहे. 


रात्री बारानंतर साउंड सिस्टीम किंवा पारंपरिक वाद्ये सुद्धा बंद करावी लागणार आहेत. अशी वाद्ये किंवा साउंड सिस्टीम सुरू ठेवल्यास ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार गुन्हे दाखल होणार आहेत. मंडळाच्या अध्यक्षांसह वाद्ये किंवा सिस्टीम मालकांवरही गुन्हा दाखल होणार आहे. दुसरीकडे, गणेश विसर्जन मिरवणुकीत पाऊस येऊनही उत्साह शिगेला पोहोचला आहे. चांद्रयान मोहिम, सूर्याच्या अभ्यासासाठी नुकतीच करण्यात आलेली आदित्य एल 1 मोहिम विसर्जन मिरवणुकीत आकर्षण आहे. पारंपरिक वाद्ये, लेझर लाईट, डीजे सुद्धा मिरवणुकीत आहेत. विसर्जन मिरवणुकीत धनगरी ढोलही आकर्षण असणार आहेत. एलईडी स्क्रीनही विसर्जन मिरवणुकीत असणार आहे. 


एकूण 582 गणेश मूर्ती पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जित


दुसरीकडे, सार्वजनिक मंडळांच्या सर्व गणपतीचे विसर्जन इराणी खणीत करण्यात येत आहे. सायंकाळी सहापर्यंत रंकाळा इराणी खण येथे 483 मोठ्या गणेश मूर्ती व लहान 99 एकूण 582 गणेश मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित झाल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या