कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Ganesh Darshan) आज (28 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गस्थ झाल्यानंतर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये सर्वच मंडळांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय नेत्यांनी सुद्धा सहभागी होत मनसोक्त आनंद लुटला. खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. त्यांनी फक्त सहभागी न होता हलगीच्या ठेक्यावर लेझीम खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. हलगीच्या ठेकावर त्यांनी लेझीम खेळत अनेकांची मनं जिंकली. लेझीमसह त्यांनी मिरवणुकीत ट्रॅकरवर स्वार होत चालवला. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांचा हटके शो दिसून आला.



यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय झालर


कोल्हापूर मनपासह जिल्ह्यामध्ये होत असलेल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचे प्रतिबिंब या गणेशोत्सवात दिसून आलं आहे. कोल्हापूर शहरात सर्वत्र लागलेल्या स्वागत कमानी त्याच्याच द्योतक आहेत. कमान्यांमधून कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरचे राजकारणही दिसून येत आहे. निवडणुका येऊ घातल्या असल्याने सर्वच राजकीय नेत्यांकडून मंडळांना मोठ्या प्रमाणावर रसद पुरवण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीत यंदाच्या गणेशोत्सवाला एकप्रकारे राजकीय झालर प्राप्त झाली आहे. मोठी मंडळे, तालीम काबीज करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून हात सैल करण्यात आला आहे. 


गणेश विसर्जन मिरवणुकीत पावसाची हजेरी 


दरम्यान, कोल्हापुरात सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असतानाच दुपारी त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. महापालिकेकडून पापाची तिकटी परिसरात स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. सर्व मंडळांना नारळ, सुपारी, पानाचा विडा आणि रोप भेट देऊन त्यांचे स्वागत केले जात आहे. दुपारपर्यंत जवळपास 200 हून अधिक मूर्तींचे विसर्जन इराणी खणीत करण्यात आले आहे. 


रात्री बारानंतर वाद्यांवर बंदी


दुसरीकडे, विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री 12 नंतर साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर सन्नाटा असणार आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास  गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमावलीनुसार गणेशोत्सवात पहिल्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी सकाळी 6 ते 12 बारापर्यंत नियमात सिस्टीम आणि पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या