कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जाहीरपणे भाष्य केलायानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. यानंतर मुरलीधर जाधव यांनी आज (5 जानेवारी) पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले. मुरलीधर जाधव यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांना दोष दिला नाही. मात्र, त्यांच्या टिकेचा रोख पूर्णत: माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यावर कडाडून प्रहार केला. तसेच मुरलीधर जाधव यांच्यावर एमआयडीसी प्रकरणातून आरोप झाल्यानंतर खुलासा केला आहे. मला गोकुळ सोडलं तर काय दिलं सांगा, अशीही विचारणा केली. 


होय उदय सामतांना भेटलो होतो 


मुरलीधर जाधव म्हणाले की, मी उदय सामंत यांना भेटलो होतो, पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन भेटलो होतो. मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा एमआयडीसीमधील एक कोटीचा प्लॉट काढून घेण्यात आला. तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे. एमआयडीसीमध्ये कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाला आहे. त्यामध्ये माजी आमदार सुजित मिनचेकर यांची टोळी काम करते. सुजित मिणचेकर यांनी सांगितले की, मुरलीधर जाधव यांचा प्लॉट काढून घ्या म्हणजे शिंदे गटात येतो, असं शिंदे गटाला सांगितलं, असा दावाही जाधव यांनी केला. 


पक्षाने घेतलेला निर्णय वेदना देणारा आहे


ते पुढे म्हणाले की, पक्षाने घेतलेला निर्णय वेदना देणारा आहे. महाविकास आघाडीमधून तिकीट मिळालं तर हे मिणचेकर काय दिवस लावणार? असा टोलाही त्यांनी मिणचेकर यांना लगावला. कालपासून माझं मानसिक संतुलन बिघडलं असून साहेबांनी या नेत्यांचं ऐकून निर्णय घेतलाच कसा असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालणार असाल, तर माझ्यासारख्या शिवसैनिकाने केवळ गोळ्या घालून घ्यायचे बाकी आहे. 


पक्ष संकटात असताना सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र मी दिले


मुरलीधर जाधव यांनी सांगितले की,पक्ष संकटात असताना सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र मी दिले. माझ्या मुलासह पत्नी आणि सगळ्यांची प्रतिज्ञापत्र सादर केली. असं असताना जर माझ्यावर कारवाई केली याचे दुःख वाटतं, मला किमान बोलवून तरी चूक सांगायला पाहिजे होतं. शिवसेना या चार अक्षराच्या पक्षाने मला मोठं केलं. मी उद्धव ठाकरे किंवा पक्षाबद्दल काहीही वाईट बोलणार नाही. माझ्या पक्षाचे चिन्ह आणि नाव टिकू दे यासाठी दिवस रात्र काम केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या