Rajarshi Shahu Maharaj: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृतीशताब्दी वर्षाचा शानदार निरोप करण्यात आला. कोल्हापूर (Kolhapur News) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने सुमारे 120 हून अधिक लोक कलावंताकडून त्यांच्या कलेच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना दिली. शाहू मिलच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना रेखावार म्हणाले की, येणाऱ्या नवीन पिढीसमोर राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणणे हे या कृतज्ञता पर्वाचे उद्दिष्ट होते. छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांना सकाळी 10 वाजता सर्वांनी वाहिलेली 100 सेंकदाची आदरांजली संपूर्ण देशासाठी आदर्शवत बाब ठरली. 


या महोत्सवासाठी पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा, इतर सर्व संस्था, संघटना, स्वयंसेवकांनी केलेली मदत अविस्मरणीय आहे. जातीभेदाला कोणत्याही प्रकारे थारा न देणे हीच छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल. फुले, शाहू, डॉ आंबेडकर यांच्या विचारावर राज्य  देश अधिक गतीने वाटचाल करेल यात शंका नाही, असेही यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हा प्रशासनाकडून सर्वांचे आभार त्यांनी मानले. 


6 ते 14 मे या 8 दिवसांच्या कालावधीत कोल्हापूरकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. 8 दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये लहान मुलांसाठी नृत्य,चित्रकला,रेखाटन, कॅलिग्राफी, शिल्पकला, पेपरक्रॉफ्ट, मातीकाम (पॉटरी), रंगकाम, मातीशिल्प आदी उपक्रम राबविले गेले. उपस्थित नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या अनेक नाट्यछटा तसेच अतिशय दर्जेदार, आशयघन चित्रपटही जिल्हा प्रशासनातर्फे मोफत दाखविण्यात आले. 


कृतज्ञता पर्वामध्ये कोल्हापूरवासियांसाठी खाद्य जत्रा, आंबा महोत्सव, शस्त्र दालन, बुक स्टॉल कापड विभाग, महिला बचत गटांच्या विविध उत्पादित वस्तूंची विक्री व उत्पादन, आय टी तसेच ज्वेलरी स्टॉल आदी बाबींचा यामध्ये समावेश होता. गेली 8 दिवस चालणारा हा स्मृती शताब्दी वर्ष सांगता सोहळा कोल्हापूरवासियांची सांस्कृतिक भूक भागवून गेला. या सोहळ्यामुळे युवा पिढीला पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जवळून पाहत आले. 


या कार्यक्रमामध्ये नाशिक येथील आदिवासींचे बोहडा, पालघर येथील तारपा, लावणी, कर्बल, लेझीम, सोंगी मुखवटे,डोल्लू कुनिता ( ढोल नृत्य ),दिवली, कोळी आदी नृत्याचे प्रकार यावेळी विविध राज्यातील कलावंतांनी यावेळी सादर केले . शानदार कार्यक्रमाचे निवेदन प्रा . निशांत गोंधळी यांनी सादर केले.


कृतज्ञता महोत्सवात सुमारे 1 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल


या महोत्सवात 1 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये सर्वाधिक उलाढाल झाली ती आंबा महोत्सवातून.  स्टॉलमध्ये सुमारे 35 लाख रुपयांहून अधिक रकमेचा कोल्हापूरवासिय व इतर नागरिकांनी आंबा खरेदी केला. या कृतज्ञतापर्वात सांस्कृतिक भवन लगत असलेल्या 108 स्टॉलमधून सुमारे 25 लाखांची, खाद्य जत्रेत 17 लाख, कापड विभागामध्ये 15 लाख तसेच बुक आणि इतर स्टॉलद्वारे सुमारे 20 लाख रुपयांहून अधिकची उलाढाल या महोत्सवात झाली .अत्यंत शांततेने पार पडलेल्या या महोत्सवात येथील जनतेने अत्यंत विनम्रतेने आपल्या लोकराजा प्रति आदरांजली अर्पण केली. 


इतर महत्वाच्या बातम्या :