Kolhapur BJP: भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर मुलाखती पार पडल्या. पक्ष निरीक्षक माजी खासदार अमर साबळे यांनी इच्छूक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर याचा अहवाल प्रदेश भाजपला पाठवण्यात येईल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन अंतिम निवड होणार आहे. सध्या दोन्ही गटात पदाधिकारी नियुक्त्यांवरून शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे कोणत्या गटाला संधी मिळणार? याची उत्सुकता आहे.


विजय जाधव, विजय सूर्यवंशी आणि अजित ठाणेकर यांची नावे शहराध्यक्षासाठी चर्चेत आहेत. ग्रामीण भागासाठी दोन अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. महानगर आणि ग्रामीण अशा सर्वच अध्यक्षांची नावे उद्यापर्यंत (15 मे) जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी अमर साबळे यांनी प्रत्येकाशी व्यक्तीगत संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. पक्ष पदाधिकारी, तालुका प्रमुख, माजी नगरसेवकांशी त्यांनी संवाद साधला. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर उपस्थित होते. 


भाजप ग्रामीण आणि महानगर जिल्हाध्यक्षांची मुदत संपल्याने नव्याने अध्यक्ष निवडला जाणार आहे. अमर साबळे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर यांच्याशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. माजी नगरसेवक नाना कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, माजी महापौर दिपक जाधव, आशिष ढवळे उपस्थित होते. प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडेही उपस्थित होते.


भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापुरातून 14 जणांची नियुक्ती


भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीवर जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून 14 जणांना संधी मिळाली आहे. यामध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. महेश जाधव यांची सचिवपदी बढती करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये ओबीसी सेलचे संदीप कुंभार, सचिन तोडकर, डॉ. अजय चौगुले आणि डॉ. संतोष चौधरी यांचा समावेश आहे. निमंत्रित सदस्यांमध्ये माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, ज्येष्ठ नेते बाबा देसाई, संग्राम कुपेकर यांचा समावेश आहे. कुपेकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 


निमंत्रित सदस्यांमध्ये माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, शिरोळचे पृथ्वीराज यादव, डॉ. अरविंद माने, विजयेंद्र माने यांचा समावेश आहे. निवडींमधून कोल्हापूर भाजपमधील सर्वच नेत्यांच्या गटांना संधी देण्यात आली आहे. सचिन तोडकर यांचीही प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. महेश जाधव यांना बढती आणि विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची निमंत्रित सदस्यमध्ये नियुक्ती झाल्याने या दोन्ही जागांवर आता नवे चेहरे येण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या