कोल्हापूर : एकाच गावातील एकाच नावाच्या तीन शेतकऱ्यांमुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना अधिकची जमीन संपादित झाल्याने गेल्या 22 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बेलेवाडीमधील कुटुंबाला न्याय मिळाला आहे. संबंधित शेतकरी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष घालत हे प्रकरण निकालात काढण्याचे आश्वासन दिलं आहे.


93 गुंठ्याच्या ठिकाणी 4 एकर जमीन संपादित 


एकाच गावातील एकाच नावाच्या तीन शेतकऱ्यांमुळे बेलेवाडीमधील शेतकरी हरी पाटील गेली 22 वर्षे शासनाच्या विरोधात लढा देत आहेत. बेलेवाडीमध्ये हरी लक्ष्मण पाटील नावाचे तीन शेतकरी आहेत. त्यापैकी एकाच्या नावावर इतर दोघांच्या जमिनीची नोंद झाली होती. त्यामुळे एका हरी लक्ष्मण पाटील या शेतकऱ्याच्या नावावर अधिक क्षेत्र दिसू लागले होते. याचा फटका प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना झाला होता. ज्या एका शेतकऱ्याची 93 गुंठे जमीन संपादित करणं आवश्यक होतं त्याठिकाणी 4 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. 


हसन मुश्रीफांकडून विषय निकाली काढण्याचं आश्वासन


ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर केवळ 93 गुंठे जमीन संपादित करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. प्रकल्पग्रस्तांना वेगळी जमीन देण्यात आली होती. मात्र, एकाच नावामुळे झालेला घोळ शासनाने मिटलेला नव्हता. संबंधित शेतकरी आंदोलनाला बसल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष घालून हा विषय निकाली काढण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या