Kolhapur News: समोर दिसताच साप मारून टाकण्याची प्रवृती सर्वत्र असतानाच आजवर तब्बल दीड हजारांवर सापांना पकडून जीवदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीला विषारी नागाने दंश केल्याने अत्यंत दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) हातकणंगले तालुक्यात घडली. आळते (ता. हातकणंगले) या गावामध्ये अनिता प्रमोद जनगोंडा (वय 35) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. अनिता यांचे पती प्रमोद यांची पंचक्रोशीत सर्पमित्र म्हणून ओळख आहे. त्यांच्याच घरी सर्पदंशाने पत्नीचाच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिता यांच्या पश्चात पती, मुलगा, परिवार आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.
मध्यरात्री नागाकडून सर्पदंश
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनिता आणि प्रमोद दोघेही घरात झोपले होते. एक ते दीडच्या दरम्यान प्रमोद यांना जाग आल्यानंतर लाईट लावल्याने त्यांना अस्सल नाग पत्नी अनिता यांच्या पायाशेजारी फणा काढून बसलेला दिसला. नागाने नागाने अनिता यांच्या पायावर दंश केला होता. त्यांनी नाग पकडण्याचा प्रयत्न करताच अनिता यांचा पाय लागल्याने नागाने पुन्हा दुसरा दंश केला. त्यांनी नागाला पकडून पत्नी अनिता यांना वैद्यकीय उपचारासाठी सांगलीमधी शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
काही वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अनिता व प्रमोद जनगोंडा यांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रमोद नोकरी करत 'सर्पमित्र' म्हणूनही परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत दीड हजारांहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्याचा सर्पदंशापासून बचाव कसा करायचा याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच अनेकांना साप पकडण्याचे ट्रेनिंगही दिले आहे.
पन्हाळा तालुक्यातही एकाची सर्पदंशाने मृत्यू
दरम्यान, पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात सागर विलास आसपे (वय 35) यांचाही संर्पदंर्शाने मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतात गेल्यानंतर त्यांना सर्पदंश झाला होता. त्यांना तातडीने बोरपाडळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. दुसरीकडे, पावसाळा सुरु झाल्यानंतर सर्पदंशाच्या अनेक घडतात. शेतीमध्ये झालेली मशागत तसेच पावसानंतर नाळ (साप असण्याची जागा) मुजल्याने अनेक साप बाहेर पडतात. त्यामुळे कळत न कळत मानवी स्पर्श झाल्यानंतर दंश केल्याचा घटना घडतात.
इतर महत्वाच्या बातम्या