Kolhapur News: आम्ही भारतीय लोक आंदोलनाकडून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी 26 जून रोजी कोल्हापुरात राजर्षी शाहू सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी 12 वाजता परिषद होणार असून ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांची प्रमुख उपस्थिती असेल. परिषदेच्या आयोजनासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.
कोल्हापूर ही पुरोगामी आणि शाहू महाराजांच्या विचारांची भूमी
या बैठकीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आर .के पोवार म्हणाले, सर्वांनी एकत्रपणे येऊन दंगल घडविणाऱ्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर म्हणाले की, कोल्हापूर ही पुरोगामी आणि शाहू महाराजांच्या विचारांची भूमी आहे, शाहू महाराजांचा विचार आणि वारसा सांगण्यासाठी शाहू जयंतीच्या दिवशी 26 जूनला राजश्री शाहू सामाजिक परिषदेचे आयोजन करूया.
मतांच्या राजकारणासाठी सरकारमधील प्रतिगामी पक्षाकडून खतपाणी
वसंतराव मुळीक म्हणाले की, आपण प्रयत्नपूर्वक आणि विवेकनिष्ठ पद्धतीने सलोखा आणि संवादाच्या भारतीय परंपरेचा मान राखून आपल्या गावाला लागलेली ही कीड वेळीच निपटून टाकूया. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे म्हणाले की, कोल्हापूर शहर हे प्रतिगाम्यांचे असल्याचा ठसा करण्याचे प्रयत्न दंगल करणाऱ्यांचे चालू आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच या दंगलीमध्ये अग्रभागी होते हे दिसून आले. मतांच्या राजकारणासाठी सरकारमधील प्रतिगामी पक्षच याला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाहू छत्रपतींचे विचार व समतेचा सामाजिक वारसा बिंबवण्याचे कर्तव्य आपले आहे.
दरम्यान, रसिया पडळकर यांनी केआयटी कॉलेजमध्ये एका महिला प्राध्यापिकेच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने कसा दबाव आणला गेला तो प्रकार सर्वांसमोर सांगितला. अशा प्रकारे सामाजिक एकी आणि संविधानातील मूल्यांचा विचार सांगणाऱ्या लोकांबद्दल भ्रम निर्माण करून त्याचा कसा अपप्रचार केला जातो त्याची माहिती दिली. असा प्रकार झाल्यास आपण सर्वांनी तेथे जाऊन त्यांना पाठबळ दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, डॉ. मेघा पानसरे, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, जनता दलाचे रवी जाधव, भारती पवार, कॉम्रेड दिलीप पवार, सुभाष जाधव ,बी. एल. बर्गे, बाबासाहेब देवकर यांची भाषणे झाली.
इतर महत्वाच्या बातम्या