kolhapur Crime : कौटुंबिक वादात काका पुतण्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime) घडली. उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल झाल्यानंतरही भांडण होऊन शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कात्यायनी कॉम्प्लेक्सजवळ कौटुंबिक कारणातून रविवारी (26 फेब्रुवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये काका आणि पुतणे असे तिघे जखमी झाले. सतीश वसंतराव रोकडे (वय 57 वर्षे), अभिजित राजेंद्र कांबळे (वय 28 वर्षे), ओंकार राजेंद्र कांबळे (वय 28 वर्षे) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश रोकडे आणि राजेंद्र कांबळे हे कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रोकडे आणि कांबळे कुटुंबीयांमध्ये वाद उफाळून आला. या वादातून दोन्हीकडून एकमेकांवर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. यामध्ये ओंकार आणि अभिजित यांच्या छातीवर वार करण्यात आला. सतीश रोकडे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली आहे. जखमींना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतरही शाब्दित बाचाबाची होऊन भांडणास सुरुवात झाल्याने तिथेही तणाव निर्माण झाला होता. 


सीपीआरच्या आवारात भांडण झाल्याने तणाव


यावेळी दोन्ही कुटुंबीयांमध्ये सीपीआरच्या आवारातच भांडणे झाली. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे येथे गर्दी जमली होती. अखेर पोलिसांनी त्यांना बाजूले हटकले, मात्र यामुळे सीपीआर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.


बायकोने नवऱ्याच्या डोक्यात सळी घातली


दरम्यान, किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामध्ये रागाच्या भरात पत्नीने डोक्यात सळी मारुन पतीला जखमी केल्याची घटना कोल्हापुरात मागील आठवड्यात घडली होती. रंकाळा टॉवर परिसरात ही घटना घडली. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीच्या ओळखीची व्यक्ती संबंधितांच्या घरी आली होती. याबाबत पतीने पत्नीकडे विचारणा केली. विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादात पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी सळीने मारहाण केली. जखमी झालेल्या पतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. 


चोरीच्या संशयाने मारहाण, एकाचा मृत्यू 


तर करवीर तालुक्यातील इस्पूर्लीमध्ये दुकानात चोरी करत असल्याच्या संशयावरुन मारहाण केल्याने अण्णासाहेब आनंदा चौगुले (वय 47 वर्षे) यांचा जखमी होऊन मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद इस्पूर्ली पोलीस ठाण्यामध्ये झाली. याप्रकरणी संशयित दिगंबर तुकाराम मगदूम (वय 30 वर्षे रा. दिंडनेर्ली ता. करवीर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या