Swabhimani Shetkari Sanghatana Agitation : प्रलंबित असलेल्या अनुदानासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 22 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. बारावीच्या परीक्षा असल्याने दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार असून राष्ट्रीय महामार्ग बंद केला जाणार नाही. ऊस तोडणी मुकादमांकडून होत असलेली ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकित अनुदान, यासह विविध प्रश्‍ंनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात (Kolhapur News) पत्रकार परिषद घेत आंदोलन करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीज बिल दुरुस्त करुन देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित 37 टक्के वीज वाढ रद्द करावी, आदी मागण्याही करण्यात येणार आहेत. 


राजू शेट्टी म्हणाले की, चक्काजाम आंदोलन राष्ट्रीय महामार्गावर होणार नसून तालुक्याच्या पातळीवरील राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्ग रोखून धरले जातील. ते पुढे म्हणाले की, "ऊस तोडणी वाहतूकदरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे, पण तोडणी मजुरांची संख्या कमी होत चालली आहे. याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 22 जिल्ह्यामध्ये 446 कोटी रुपयांची मुकादमांनी फसवणूक केली आहे."


स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटना स्थापना


राज्य पातळीवरील स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या संघटनेमार्फत ऊस तोडणी कल्याण महामंडळाकडून आता मजुरांची नोंदणी करुन कारखान्यांना मजूर पुरवावेत, वाहतूकदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करताना स्थानिक पोलिसांनी सखोल चौकशी करावी, टोळ्या पळालेल्या वाहतूकदारांच्या मागचा बँकेचा ससेमिरा कमी करावा, हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


चंद्रशेखर राव यांची ऑफर राजू शेट्टींनी नाकारली


दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळण्याची ऑफर दिली होती. मात्र, राजू शेट्टी यांनी नम्रपणे ही ऑफर नाकारली आहे. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. तसेच करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नसून, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली. 


इतर महत्वाच्या बातम्या