Kolhapur News: नियतीचा क्रूर खेळ कधी आणि कसा होईल, याचा अंदाज क्षणभंगूर आयुष्यात कधीच येत नाही. नियतीच्या खेळाने दिलेल्या वेदना अनंत काळासाठी जाणवत असतात. असाच हृदयद्रावक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरमध्ये घडला. आईच्या छातीत दुखू लागल्यानंतर उपचारासाठी सीपीआरमध्ये घेऊन आलेल्या मुलाचाच हृदयविकाराच्या धक्क्याने झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे काही काळासाठी सीपीआरमध्ये सन्नाटा पसरला. संतोष गवरे (वय ४२) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. संतोष आईसोबत कसबा बावड्यास वास्तव्यास होता.
दवाखान्यात आईच्या सेवेत
संतोष गवरे यांच्या आई लीलाबाई यांना छाती दुखू लागल्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी उपचार झाल्यानंतर आईची प्रकृती स्थिर होती. सीपीआरमध्ये आई दाखल असल्याने तो आईची काळजी करत होता. सोमवारचा दिवस त्यांचा आईच्या विविध चाचण्या करण्यातच गेला. संतोषची आई लीलाबाई यांना सीपीआरमधील वेदगंगा इमारतीत ॲडमिट करण्यात आले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना एमडी मेडिसीन विभागातील आयसीयूमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. सायंकाळी आईला बरं वाटू लागल्यानंतर संतोषची बहीण व अन्य नातेवाईक संध्याकाळी जेवण घेऊन आले. आईला बहिण भावांनी जेवण दिल्यानंतर दवाखान्यात वस्तीला संतोष स्वतः थांबला होता.
झोपेतच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार वेदगंगा इमारतीबाहेर रिकाम्या जागेत संतोष काहीवेळ बसून होता. त्यानंतर मध्यरात्री झोपी गेला. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे इमारतीत स्वच्छता कर्मचारी सफाईसाठी आले असतानाच एक व्यक्ती निपचित पडल्याची दिसली. सुरक्षारक्षक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी वॉर्डात नेले. मात्र, त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आईचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या संतोषच्या मृत्यूने सीपीआरमध्ये एकच सन्नाटा पसरला. सीपीआर परिसर दररोज मृत्यू अन् वेदना अनुभवत असतो. मात्र, मंगळवारचा प्रसंग काळीज हेलावून टाकणारा होता.
आई गेल्याचं समजताच मुलानंही दुसऱ्याच दिवशी जीव सोडला
दरम्यान, एक आठवडाभरापूर्वीच जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आईच्या मृत्यूनंतर मुलानेही दुसऱ्याच दिवशी जीव सोडल्याची धक्कादायक घटना घडली होती. बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर सांगलीत डेंगूसदृश्य आजारामुळे उपाचर घेत असलेल्या त्यांच्या मुलानेही दुसऱ्याच दिवशी जीव सोडला. गोपाळ खंडू पाटील असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या