Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात भयावह आत्महत्यांची मालिका सुरुच आहे. जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वेतवडे  बेताची परिस्थिती आणि आजारपणाला कंटाळून आयुष्याच्या उत्तरार्धात असलेल्या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.वेतवडेमधील महादेव दादु पाटील (वय 75) आणि त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील (वय 70)या वृध्द दाम्पत्याने बुधवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान राहत्या घरी माळ्यावरील तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वेतवडे गावात आण्णा आणि द्वारकाआई म्हणून हे वृध्द दाम्पत्य प्रसिद्ध होते. 


आयुष्यभर स्वाभिमानाने जगलेल्या आण्णा द्वारकाआईला आजाराने आणि परिस्थितीने ग्रासल्याने हतबल होऊन गेले होते. टीचभर आयुष्याच्या शेवटाकडे प्रवास सुरु असताना अशा पद्धतीने शेवट केल्याने कुटुंबासह गावही हादरून गेले. आई वडिलांनी केलेल्या आत्महत्येनंतर मुलगा आकाराम महादेव पाटील यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


आयुष्यभर कष्ट हीच भाकरी  


घरची परिस्थिती बेताची असणारे महादेव पाटील व त्यांची पत्नी द्वारकाबाई पाटील वेतवडेत गरीब व स्वाभिमानी वृध्द दाम्पत्य होते. दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार घरी आहे. वयाच्या सत्तर पंचाहत्तरीमध्ये दिवसभर शेतात काबाडकष्ट करून राबून ते पोटाची खळगी भरत होते. 


परिस्थितीला थकले मरणाची तयारी केली 


परिस्थिती आणि आजारपणाने बेजार झालेल्या अण्णा आणि द्वारकाआईने आयुष्याचा शेवट करण्यासाठी केलेली तयारी काळजाचा थरकाप उडवणारी आहे. आयुष्यभर एकमेकांच्या सुख दु:खाचे साक्षीदार राहिलेल्या या वृद्ध दाम्पत्याने शेतातच अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी केली होती. अंत्यसंस्कारासाठी शेतातील एक कोपरा निवडत मंगळवारी सायंकाळी त्यांनी जागा केली. अग्नी देण्यासाठी लाकडेही गोळा केली, पाण्याची घागर भरुन ठेवली, तसेच गवत आणि मयताचे साहित्य इत्यादी कामे त्यांनी स्वतःच करुन ठेवल्याने हा प्रसंग काळीज चिरणारा होता. 


आईच्या सेवेत गुंतलेल्या लेकराला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गाठले


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातही हृदयद्रावक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरमध्ये घडला. आईच्या छातीत दुखू लागल्यानंतर उपचारासाठी सीपीआरमध्ये घेऊन आलेल्या मुलाचाच हृदयविकाराच्या धक्क्याने झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे काही काळासाठी सीपीआरमध्ये सन्नाटा पसरला. संतोष गवरे (वय ४२) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. संतोष आईसोबत कसबा बावड्यास वास्तव्यास होता.


संतोष गवरे यांच्या आई लीलाबाई यांना छाती दुखू लागल्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी उपचार झाल्यानंतर आईची प्रकृती स्थिर होती. सीपीआरमध्ये आई दाखल असल्याने तो आईची काळजी करत होता. दवाखान्यात वस्तीला संतोष स्वतः थांबला होता. वेदगंगा इमारतीबाहेर रिकाम्या जागेत संतोष काहीवेळ बसून होता. त्यानंतर मध्यरात्री झोपी गेला. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे इमारतीत स्वच्छता कर्मचारी सफाईसाठी आले असतानाच एक व्यक्ती निपचित पडल्याची दिसली. सुरक्षारक्षक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी वॉर्डात नेले. मात्र, त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आईचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या संतोषच्या मृत्यूने सीपीआरमध्ये एकच सन्नाटा पसरला.