Kolhapur News: अंगणात खेळत असताना घराशेजारी असलेल्या खड्ड्यात पडून अवघ्या दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) पंचतारांकित एमआयडीसीत घडली. विराज अमोल मालवाने (रा. सध्या रा.पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, तळदंगे) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी तळदंगे औद्योगिक वसाहतीत घडली. घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल अशोक मालवाने हे एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत. तिथेच ते कंपनीच्या खोलीत पत्नी सुनीता व दोन मुलांसह राहत होते. त्यांना राजवीर (वय 6) व विराज (वय दीड वर्षे) अशी दोन मुले आहेत. अमोल रात्रपाळीला कामावर जाण्यापूर्वी अंघोळीला गेले होते, तर त्यांच्या पत्नी सुनीात घरकाम करत होत्या. विराज मोठा भाऊ राजवीसह अंगणात खेळत होता.


विराज दिसला नसल्याने सर्वत्र शोध  


विराज अंगणात खेळताना न दिसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण सापडला नाही. राहत्या घरापासून 20 ते 25 फुटांवर असलेल्या खड्डयात जाऊन पाहिले असता पाण्यात बुडबुडे येताना दिसून आले. कुटुंबियांनी संशय आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे कंपनीमधील इतर कर्मचाऱ्यांनी खड्डयात उतरून चिमुरड्या विराजचा शोध घेतला असता तो पाण्यात बुडाल्याच्या अवस्थेत सापडला. 


आजीची नजर चुकवून गेला आणि नियतीने डाव साधला


दरम्यान, मामाच्या गावी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या अवघ्या 13 वर्षीय आदित्य शिवाजी पाटील या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वेतवडेमध्ये मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात घडली होती. पोहण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. आदित्य वेतवडेमध्ये मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी महिनाभर राहण्यासाठी आला होता. वेतवडे येथील धामणी नदीत आंघोळीसाठी गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तसेच पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने सर्वत्र त्याची शोधाशोध सुरू करण्यात आली. जनावरांना पाण्यासाठी घेऊन गेलेल्या एका व्यक्तीला नदीकाठी चप्पल व कपडे दिसल्याने तो या ठिकाणीच बुडाला असणार याचा अंदाज घेऊन गावातील तरुणांनी पाण्यात शोध सुरु  केला. अखेर सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.


इतर महत्वाच्या बातम्या