Chandradeep Narke : माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटात प्रवेश निश्चित केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात टीका केली होती. आता नरके गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चंद्रदीप नरके यांच्या विजयाची चिंता करू नये, कट्टर शिवसैनिक हिंदुत्ववाद्याला मतदान करणार की काँग्रेसला, याचे उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी द्यावे, अशी मागणी कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील आणि नरके गटाकडून करण्यात आली आहे. 


संजय पाटील म्हणाले, की शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे कट्टर शिवसैनिक आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी झाल्यावर कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक हिंदुत्ववाद्याला मतदान करणार की काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार, याचे उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी द्यावे आणि त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे.


पाटील पुढे म्हणाले की, की नरके कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. ते शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा आमदार झाले. सध्या ते आमदार, खासदार नसून त्यांनी शिवसेनेतून फुटून जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांना गद्दार म्हणणे योग्य आहे का? याबाबत जिल्हाप्रमुखांनी आत्मपरीक्षण करावे. कट्टर शिवसैनिक असणाऱ्या चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती तसेच बहुसंख्य ग्रामपंचायतींत फडकवला. एका सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद उपाध्यक्षपद, तर एका गरीब कार्यकर्त्याच्या पत्नीला समाजकल्याण सभापतिपद दिले. बाजार समिती आणि गोकुळ दूध संघात शिवसैनिकांना संधी दिली. अशा कट्टर शिवसैनिक चंद्रदीप नरके यांचा निषेध करण्याची गरज नव्हती.


ही शिवसेनेशी गद्दारी नव्हे का?


संजय पाटील म्हणाले, की विधानसभा 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे काही पदाधिकारी, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तत्कालीन आमदार चंद्रदीप नरकेंना विजयी करण्याऐवजी काँग्रेसच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. ही शिवसेनेशी गद्दारी नव्हे का? हा सर्व प्रकार करवीरच्या जनतेस माहिती आहे. दरम्यान, चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच शिवसेनेतून आणि धनुष्यबाण चिन्हावर मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. धनुष्यबाण घेऊनच मी महायुतीचा उमेदवार म्हणून करवीरच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


करवीरमधून दोनवेळा आमदार 


नरके करवीरमधून दोनवेळा शिवसेनेकडून निवडून आले आहेत. शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्हीही खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात गेले. माजी आमदार राजेश क्षीरसागरही शिंदे गटात गेले. मात्र, नरके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती, पण मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात आल्यानंतर हळूच मागच्या दाराने हजेरी लावून स्वागत केले होते. कोल्हापूर विमानतळावर अमित शाह यांच्या स्वागताला भाजप नेत्यांनी गर्दी केली होती, त्यात नरके यांचीही उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या