Kalamba Jail: गैरकृत्यांमुळे अक्षरश: बदनाम झालेल्या कळंबा जेलमध्ये आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला तिच्या अल्पवयीन मुलाला कळंबा जेलच्या तटबंदीवरून गांजा आत फेकण्याच्या तयारीत असताना मुसक्या आवळण्यात आल्या. कोमल सुनील भोरे (वय 38, रा. राजेंद्र नगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. कोमल आणि तिचा मुलगा कळंबा जेलच्या तटबंदीवरून प्लास्टिकच्या बाटलीतून गांजा आत फेकण्याच्या तयारीत होते. यावेळी तुरुंगरक्षक अरुण बाबर यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला. या महिलेकडून 235 ग्रॅम गांजा, मोबाईल आणि पांढऱ्या रंगातील पदार्थ जप्त करण्यात आला.


महिला जाळ्यात कशी सापडली?


कोमल तिच्या मुलासह रविवारी (7 मे) सकाळी जेलच्या तटबंदीजवळ संशयास्पदरित्या फिरत होती. जेलच्या मनोरा क्रमांक 3 वर अरुण बाबर कर्तव्य बजावत होते. त्यांना हा प्रकार दिसून येताच ते तत्काळ तटबंदीजवळ पोहोचले. यावेळी कोमल गांजा असणारी प्लास्टिकची बाटली जेलमध्ये फेकण्याच्या तयारीत होती. त्यावेळी बाबर यांनी तिला व मुलाला रंगेहाथ पकडले वरिष्ठांच्या स्वाधीन केले. हा गांजा कोणासाठी होता? कोणाकडून उपलब्ध करण्यात आला याबाबत आता तपास केल्यानंतर स्पष्टता येणार आहे. 


गांजाधारी आहेत तरी किती?


कळंबा जेलमध्येच गांजाधारी आहेत तरी किती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कैद्यांच्या मारामारी, खून, गांजा सापडणे, आरोपी पळून जाणे, मोबाईल सापडणे, अधिकाऱ्याकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार आदी सलग घटनामुळे कळंबा जेल पूर्णत: बदनाम होऊन गेले आहे. जेलच्या सुरक्षेसाठी पुरेसा मनुष्यबळ उपलब्ध नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले का उचलली जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या