Kohapur News : सोलापुरातील (Solapur) सांगोल्यात जुनोनीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील जठारवाडी (Jatharwadi) येथील सात जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. यामुळे जठारवाडी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. आज पहाटेच्या सुमारास जठारवाडीत गावात पाच मृतदेह पोहोचले आणि शोकाकूल वातावरणात एकत्रित अंत्यसंस्कार गावकऱ्यांनी केले. 


जठारवाडी येथील 35 जणांची दिंडी आठ दिवसांपूर्वी गावातून पंढरपूरकडे रवाना झाली. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. शारदा आनंदा घोडके (वय 61 वर्षे), रंजना बळवंत जाधव (वय 55 वर्षे), सुनिता पवार, गौरव पवार (वय 14 वर्षे), सर्जेराव श्रीपती जाधव (वय 52 वर्षे), सुनीता सुभाष काटे (वय 50 वर्षे), शांताबाई शिवाजी जाधव (वय 62 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी सुनिता पवार आणि गौरव पवार हे मायलेक असून ते जठारवाडी इथले पाहुणे आहेत. ते मूळचे वळीवडे गावचे रहिवासी आहेत.


सांगोल्यात भीषण अपघात
विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत काल सायंकाळी (31 ऑक्टोबर) कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांचा जागीच, तर एका वारकऱ्याचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. पाच वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. 


कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडलं
काल सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी इथल्या बायपास रस्त्याजवळ आली असताना मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला. अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.


संबंधित बातमी


सांगोला : कार्तिकी वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये भरधाव कार घुसली; करवीर तालुक्यातील 7 वारकऱ्यांचा करुण अंत