Eknath Shinde in Kolhapur: कोल्हापूरची जनता विकासांच्या मुद्यांवर आग्रही असते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे. गेल्या दहा-अकरा महिन्यात शासनाने विविध विकास कामांसाठी जिल्ह्याला 762 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोल्हापूरकरांची अनेक वर्षापासूनची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मगणी पूर्ततेसाठी लवकरच मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना भेटून विनंती करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंचगंगा प्रदूषण मुक्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तपोवन मैदानात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते शासन योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, करवीर निवासनी अंबाबाई मंदीराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. भारत दर्शन अंतर्गत तीर्थ क्षेत्र पर्यटन परिक्रमासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सरकारी काम आणि सहा महिने थांब हा पायंडा खोडून काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन दुत म्हणून काम करीत आहे. योजनांच्या लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठीही सर्व सामान्य लोकांना खेटे घालावे लागू नयेत यासाठीही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. 


परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर 


परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असल्याचा अभिमान व्यक्त करुन 1 लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र शासन राबवित असलेल्या योजनेत महाराष्ट्र शासनाने आणखी सहा हजार रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपये मिळणार आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. 


पालकमंत्री केसरकर काय म्हणाले?


कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक विशेष बैठक घेऊन निधी उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेंडा पार्क येथे मोठी जागा असून ही जागा विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात मिळावी, कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, रंकाळा तलाव, पंचगंगा प्रदूषण या बरोबरच  महापालिका नवीन इमारतीसाठी 160 कोटीचा निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. 


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनव कल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यात राबविला जात आहे.  या उपक्रमातून शासनाच्या योजनांचा थेट लाभ लाभार्थीला मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन गतीने काम करीत असल्याचे सांगितले. 


एमआयडीसीचा येत्या सहा महिन्यांत विस्तार


उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाने आपले सर्व निर्णय शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या हिताचे घेतले असल्याचे सांगितले. तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने विविध योजना राबविल्या जात आहेत. कोल्हापूर येथील एमआयडीसीचा येत्या सहा महिन्यांत विस्तार करण्यात येईल. तसेच तालुकास्तरावर ही एमआयडीसी सुरू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. लघु  उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी असल्याने  या पुढील काळात एमआयडीसीचा विकास करताना त्यामधील 15 टक्के जागा लघु उद्योगांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 100 कोटी रुपये एमआयडीसीला मंजूर करण्यात आले आहेत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.