Eknath Shinde in Kolhapur: राज्यातील प्रमुख दैनिकांना शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीनंतर राज्यापासून ते पार दिल्लीपर्यंत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आजच्या कोल्हापुरात पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच जाहिरातीवरून दांडी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ती जाहिरात शासनाने दिलेली नाही. मात्र लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सहकारी मंत्री हे सगळ्यांचे श्रेय आहे आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ आमच्या सरकारला दिले आहे त्यामुळेच आम्ही एवढ्या जोमाने काम करू शकलो. अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देत आहोत. हे सर्व प्रकल्प कोट्यवधी लोकांना दिलासा देणारे आहेत. त्यामुळेच लोकांनी खऱ्या शिवसेना भाजप सरकारला पसंती दिलेली आहे. 


आणि मुख्यमंत्री अडखळले!


सीएम एकनाथ शिंदे यांना जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे का नाहीत? असे विचारले असता त्यांना थेट उत्तर देता आले नाही. ते काही काळ अडखळल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, हा जनतेचा मोठेपणा आहे. ती जाहिरात सरकारची नाही. मात्र, त्या जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील भावना या माध्यमातून दिसून आल्या आहेत. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. आम्ही आमचे काम करत राहू. आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही. आरोप जेवढे करतील त्यापेक्षा दुपटीने आम्ही काम करू. 


हे सर्वसामान्यांच सरकार


तत्पूर्वी, खास कोल्हापुरी भाषेतून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचं आहे. सरकारी कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारायला लागू नये यासाठी प्रयत्न केला.  एका छताखाली सरकारी योजना देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितापेक्षा दुसरा निर्णय घेतला नाही. आधीच्या सरकारनं एकही सिंचन प्रकल्प मंजूर केला नव्हता, पण आता तुमच्या सरकारने 29 सिंचन प्रकल्प मंजूर केले. 


शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. गेल्या सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, पण अंमलबजावणी झाली नाही. आम्ही याची अंमलबजावणी केली आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केले.11 महिन्यात हे सरकार लोकप्रिय झाले. काल एक सर्व्हे आला आणि त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा उल्लेख केला. आम्ही दोघांनी दिल्लीकडे निधीची मागणी केली की एक रुपया कमी येत नाही. कोल्हापूरचा टोल बंद करणारा मंत्री एकनाथ शिंदे होता हे लक्षात ठेवा. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लागेल तो पैसा दिला जाईल, पण नदी प्रदूषणमुक्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. सरकारी काम आणि सहा महिने थांब हे पुसून काढायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या