Deepak Kesarkar : शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज (19 मार्च) आढावा बैठकीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता एक भलताच प्रसंग घडला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने आणि त्याचवेळी पालकमंत्र्यांचे आगमन झाल्याने पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावलेलं असल्याने पालकमंत्र्यांना आपला तापा दुसऱ्या गेटने आत न्यावा लागला. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी दीपक केसरकर यांनी बोलताना आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या खोक्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
आदित्य ठाकरे यांना लहानपणापासून खोक्यांबरोबर खेळण्याची सवय असेल
दीपक केसरकर टोला लगावताना म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना लहानपणापासून खोक्यांबरोबर खेळण्याची सवय असेल. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून होत असलेल्या टीकेचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, आम्हाला स्वतः उद्धव ठाकरे यांनी निघून जा म्हणून सांगितले होते. सर्वजण सोडून जात असताना आम्हाला फसवलं का म्हणता? अशी विचारणा यावेळी दीपक केसरकर यांनी केली.
कोल्हापूरकरांचा पालकमंत्र्यांना घेराव
दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना तडकाफडकी पदमुक्त केल्याने कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. याचा प्रत्यय पालकमंत्री दीपक केसरकर यांना आला. सचिव पदावरून शिवराज नाईकवाडे यांना का हटवण्यात आलं? असा सवाल कोल्हापूरकरांनी आज दीपक केसरकर यांना अंबाबाई मंदिर परिसरात विचारला. नाईकवाडे यांना का हटवण्यात आलं? अशी विचारणा कोल्हापूरकरांनी केसरकर यांच्याकडे केली. पालकमंत्री केसरकर अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात पोहोचले असता यावेळी त्यांना कोल्हापूरकरांनी घेराव घातला. चोर सोडून संन्यासाला फाशी कशासाठी देता? अशी विचारणा कोल्हापूरकरांनी केसरकर यांना केली. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एका रात्रीत हटवण्यामागे कारण तरी काय? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. कोल्हापूरकरांनी जिल्हाधिकारी हे मनमानी करत असल्याचा आरोप केसरकर यांच्यासमोर केला.
गेल्या काही दिवसांपासून अंबाबाई मंदिरातील मूर्तीची नाजूक स्थितीवरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच अनुषंगाने काही मीडियामधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच अंबाबाई मंदिरात मीडियाला कॅमेरा घेऊन बंदीचा फतवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. TRP साठी बातम्या दाखवल्या जात असल्याचा अजब आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :