Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोलीत (ता. शाहूवाडी) अल्पवयीन बालक आणि बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर आणि ग्राम बाल समिती, कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने रोखण्यात यश आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांच्या आईवडिलांचे समुपदेशन करुन विवाह थांबवण्यात आला.


कोतोली गावातील अल्पवयीन बालिका आणि अल्पवयीन बालक यांचा बालविवाह कोतोलीमध्ये गुरुवारी 13 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून कोतोली गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि इतर सदस्य आणि गावचे ग्रामसेवक जीवन कदम यांना माहिती देण्यात आली.  ग्राम बाल संरक्षण समिती प्रतिनिधींकडून संबंधितांच्या वयाची खात्री केली असता बालिकेचे वय 18 वर्षे 3 महिने व बालक वय 17 वर्षे एक महिने असल्याचे दिसून आले. 


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम बाल संरक्षण समिती कोतोलीमधील प्रतिनिधी सरपंच दिलीप पाटील, पोलीस पाटील पांडुरंग कोळापटे व ग्रामसेवक जीवन कदम तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या जिल्ह्यामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण चालू आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यामुळे समितीमधील सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होवून त्या अधिक समर्थ राहून काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाल विवाह होत असल्यास वेळीच थांबवता येणे शक्य होत आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी सांगितले.


अल्पवयीन मुलाच्या विवाहप्रकरणी 14 जणांवर गुन्हा


दरम्यान, इचलकरंजीमध्ये अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीशी लग्न लावल्याप्रकरणी तब्बल 14 जणांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अल्पवयीन मुला- मुलीचे आई-वडील, लग्न लावणारी व्यक्ती यांच्यासह अन्य साक्षीदार यांचा समावेश आहे. तत्पूर्वी, पन्हाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात कळे पोलिसांना यश आले होते. अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती कळे पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तत्परतेने अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांना भेटून त्यांचे समुपदेशन केले. योग्य वय झाल्यानंतरच मुलीचा विवाह करा, असा सल्ला दिला. पोलिसांच्या समुपदेशानामुळे अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह होऊ घातलेला विवाह थांबला.


इतर महत्वाच्या बातम्या