Satej Patil : काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) आज (12 एप्रिल) 51 व्या वर्षात पर्दापण करत आहेत. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिकांची गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ सत्ता असलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणूक प्रचाराची झलक सुद्धा दिसून आली.


वाढदिवसालाही राजाराम कारखान्याच्या प्रचाराची किनार 


आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी राजाराम कारखान्याच्या प्रचाराची किनार पाहायला मिळाली. व्यासपीठासमोर ऊस ठेऊन त्यावर 'कंडका पाडायचाच' असा केलेला उल्लेख फलक चांगलाच लक्षवेधी ठरला. सकाळपासून सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होत होती. मात्र, या निमित्ताने सतेज पाटलांनी निवडणुकीच्या प्रचाराची संधी सोडली नाही. 




'राजाराम'च्या बाबतीत लोकांमध्ये उत्सुकता 


सतेज पाटील म्हणाले की, "दरवर्षी वह्यांच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारतो. राजाराम कारखान्याच्या बाबतीत लोकांमंध्ये उत्सुकता आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजारामसाठी शुभेच्छा देत आहेत यावरुन कल लक्षात येतो." 


वज्रमूठ सभा गांधी मैदानात 


महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा कोल्हापुरात 28 एप्रिल रोजी होत आहे. ही सभा कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर होणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. आमदार हसन मुश्रीफ, आपण स्वत: आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह सगळेच सभा यशस्वी करणार असल्याचे ते म्हणाले. 


'शरद पवारांना भेटायला जाण्यात गैर नाही'


उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरुनही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "शरद पवार यांना गेल्या दहा वर्षात कोण कोण भेटायला गेलं हे चॅनेलनी दाखवलं आहे. त्यांचा अनुभव मोठा असल्याने भेटायला जाण्यात गैर नाही. भाजप नेतेही त्यांना भेटायला गेल्याचे फोटो आहेत." तर आमदार हसन मुश्रीफांवरील कारवाई दुर्दैवी असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. "राजकारणातून मुश्रीफ यांच्यावर होणारी कारवाई दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. हे समाजाच्या दृष्टीने देखील चुकीचं असून अंबाबाई चरणी प्रार्थना आहे ते यातून बाहेर पडोत," असे ते म्हणाले. 


कर्नाटकमध्ये 40 टक्के कमिशन ही प्रथा पडल्याने लोक कंटाळाली आहेत. वेगवेगळ्या पक्षातील 22 महत्त्वाचे लोक काँग्रेस पक्षात आले आहेत, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. 


VIDEO : Satej Patil : राजाराम कारखाना, मविआची सभा ते ठाकरे-पवार भेट; सतेज पाटील काय-काय म्हणाले?



इतर महत्वाच्या बातम्या