Balumama : गेल्या काही दिवसांपासून वादाचा केंद्रबिंदू झालेल्या बाळूमामा देवस्थान विश्वस्त मंडळ शेवटी बरखास्त करण्यात आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराविरोधात भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. त्याचा निकाल सोमवारी आल्यानंतर मंडळ बरखास्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे. धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी याबाबत आदेश दिले आहेत. प्रशासक अधीक्षकपदी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव राहिलेल्या शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन सदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. मंडळात नाईकवाडे यांच्यासह निरीक्षक एम. के. नाईक आणि निरीक्षक श्रीनिवास शेनाॅय यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
आदमापुरातील संत बाळूमामा मंदिरात विश्वस्त मंडळातील कारभाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. ऑगस्ट 2021 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मंदिराच्या दान रकमेचा तत्कालीन कार्याध्यक्षांनी योग्य वापर केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावरुन वाद सुरु होता. ट्रस्ट सदस्य आणि विश्वस्त मंडळामध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली होती. दोन्ही गटांनी आपणच ट्रस्टचे विश्वासू असल्याचा दावाही केला होता.
भर रस्त्यात हाणामारी
दरम्यान, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापुरातील बाळूमामा मंदिराचे (Balumama) विश्वस्त आणि आदमापूरचे सरपंच यांच्यात भर रस्त्यात हाणामारी झाली होती. 3 एप्रिल रोजी कोल्हापुरात हा प्रकार घडला होता. रिक्त झालेल्या जागांवर गावाला विचारात न घेता ट्रस्टींची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी केला होता. त्याच संदर्भात कोल्हापुरात वकिलांची भेट घेण्यासाठी आले असतानाच ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले समर्थकांनी हल्ला केला होता.
दरम्यान, गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आला होता. सचिवपदाचा पदभार स्वीकारल्यापासून शिवराज नाईकवाडे अत्यंत तळमळीने काम केले होते. त्यांच्या कामाचे कोल्हापूरमध्ये कौतुक झालं असताना अचानक असा पदभार का काढून घेण्यात आला? यावरुन पालकमंत्र्याना सुद्धा जाब विचारण्यात आला होता. त्यामुळे आता त्यांच्याकडेच बाळूमामा देवस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आदेश येताच पदभार स्वीकारला.
इतर महत्वाच्या बातम्या