Bidri Sakhar Karkhana: निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच गेल्या अनेक दिवसांपासून बिनविरोध प्रक्रिया पार पाडली जाणार अशी चर्चा रंगली असतानाच बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bidri Sakhar Karkhana) अखेर लांबणीवर पडली आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी मागणी केली होती. ऐन पावसाळ्यात बिद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील पावसाचे प्रमाण लक्षात निवडणूक लांबणीवर टाकण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित  करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक 30 सप्टेंबर 2023 नंतरच होईल. 


दरम्यान, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी प्रसिद्ध केली आहे. मतदानासाठी 'अ' वर्ग उत्पादक सभासद मतदार 55 हजार 65 इतके आहेत, तर 'ब' वर्ग संस्था गटासाठी 1022 व चार व्यक्ती असे मतदार पात्र ठरले आहेत. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी संपल्याने सध्या काळजीवाहू संचालक मंडळ काम करत आहे. कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची संख्या 21 वरुन 25 करण्यात आली आहे. कारखान्याचे राधानगरी, कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील 218 गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे. 


6 हजार 319 मृत सभासद वगळले


कारखान्याकडून सभासद यादी मागवण्यात आल्यानंतर त्याची छाननी करण्यात आली. त्यानंतर मृत सभासद यादी, कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर हरकती आणि आक्षेप नोंदवण्याची मुदत पार पडल्यानंतर अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. कारखान्याचे एकूण 61 हजार 384 सभासद आहेत. तथापि, सभासदांची छाननी पार पडल्यानंतर 6 हजार 319 सभासद मृत झाल्याने यादीतून वगळण्यात आले. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्याने प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा होती. 


बिनविरोधसाठी सूतोवाच, पण प्रत्यक्षात स्थिती काय?


कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार के.पी पाटील यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला विरोधी आघाडीकडूनही आमची हरकत नसल्याचे म्हणत प्रतिसाद दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात अजून कोणतीही हालचाल झालेली नव्हती. कुरुकलीमध्ये (ता. कागल) बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी बिद्रीच्या बिनविरोध निवडणुकीवर भूमिका स्पष्ट केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या