कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणेत सुट्टीवर आलेल्या जवानाने दुसऱ्याच दिवशी तिघांच्या मदतीने तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. विकास आनंदा पाटील (वय 40, रा. पोर्ले तर्फे ठाणे) असे मृताचे नाव आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. जवान युवराज शिवाजी गायकवाड (वय 40 रा. पोर्ले तर्फे ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास आणि युवराज यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होता. याच कारणातून या दोघांमध्ये फेब्रुवारी महिन्यात सुद्धा वाद झाला होता. युवराज भारतीय सैन्य दलामध्ये आहे. तो फेब्रुवारीमध्ये वाद करून गेल्यानंतर पुन्हा शनिवारी सुट्टीसाठी गावी आला होता. 


आईच्या डोळ्यादेखत लेकाला मारहाण 


काल (19 मे) रविवारी विकास आणि त्याची आई दुचाकीवरून संध्याकाळी सात वाजता धारा काढून शेतातून घरी येत होते. यावेळी गावच्या कमानीजवळ एका चार चाकी कारने विकासची दुचाकी अडवली. यावेळी चार चाकी मधून जवान युवराजसह चौघेजण उत्तरले. यावेळी तिघांनी तोंडाला मास्क लावला होता. या सर्वांनी विकासला मारहाण करण्यास सुरुवात केली. विकासच्या डोक्यात बांबूनी मारहाण करण्यात आली. लेकाला मारहाण होत असल्याने आईने आक्रोश केल्यानंतरही मारहाण करणाऱ्यांना दया आली नाही. त्यांनी त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करत पळ काढला. विकासला बेदम मारहाण करून हल्लेखोरांनी पळ काढला. 


सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू


अत्यंत जखमी अवस्थेत विकासला तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विकासच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. वाद कोणत्या कारणातून होता याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. विकासच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक मोठ्या प्रमाणामध्ये सीपीआरमध्ये दाखल झाले होते. विकासचा मृत्यूने एकच आक्रोश केला. 


इतर महत्वाच्या बातम्या