Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे यांचे कोल्हापुरात निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून महावीर महाविद्यालयापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. प्रकृती बिघडल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 


गुलाबराव घोरपडे यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील माद्याळ होते. याठिकाणी ते महावीर महाविद्यालय परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात मुलगा विनायक आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयंत तासगावकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी दवाखान्यात धाव घेतली. घोरपडे यांचे पार्थिव डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे. 


गुलाबराव घोरपडे सन 2000 ते 2010 या कालावमधीमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही काळ वकिली सुद्धा केली होती. ते 40 वर्षांपूर्वी आपल्या मूळ गावातून कोल्हापूरमध्ये आले होते. त्यांची काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीत सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पापाची तिकटी येथे झालेल्या सत्याग्रह आंदोलनात ते सहभागी झाले होते. घोरपडे यांचे काँग्रेससोबत दीर्घकाळ संबंध असल्याने राज्यस्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांशी त्यांचे संबंध होते. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी होते. 


इतर महत्वाच्या बातम्या