Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपासह इचलकरंजी मनपा विभागामध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेने पाळीव कुत्र्यांसाठी काढलेल्या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन जातींच्या कुत्र्यांना अत्यंत हिंस्त्र समजतानाच त्यांना फिरायला घेऊन जाताना काळजी न घेतल्यास थेट कुत्रा जप्त करून मालकांवर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. पाळीव कुत्र्यांबद्दल बंदोबस्त झाला. मात्र भटक्या कुत्र्यांच्या हैदोसाचे काय? त्यांचा बंदोबस्त कधी केला जाणार? अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे.
तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई केली जाणार
रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन जातींच्या कुत्र्यांचा स्वभाव हा अतिहिंस्त्र असतो. त्यामुळे त्यांना फिरवताना काही नियम महापालिकेने बनवले आहेत. ते नियम पाळले नाही तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई केली जाणार आहे. तशी जाहिरातच महापालिकेने काढली आहे. फिरवताना श्वानांना चेन किंवा बेल्ट लावणे, तोंडाला मझल लावणे. त्या मझलचा श्वानाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणे, असे आदेश कोल्हापूर महानगरपालिकेने काढले आहेत.
काय म्हटलं आहे नोटीसमध्ये?
कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोल्हापूर शहरांमध्ये रोटविलर्स, पिटबुल, जर्मन शेफर्ड व डोबरमन यासारख्या जातीच्या कुत्र्यांचे पालन केले जाते. अशाच प्रकारच्या कुत्र्यांचा स्वभाव हा अत्यंत ही हिंस्त्र आहे. अशा जातीचे कुत्रे रस्त्यावर फिरायला सोडलेस त्यापासून इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तरी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की वरील जातींची कुत्री फिरायला घेऊन जातेवेळी त्यांना चेन, बेल्टने बांधून सोबत घेऊन जावे. तसेच कुत्र्यांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तोंडाला मझल लावावा. मझल न लावता कुत्रा फिरवताना आढळल्यास तो कुत्रा जप्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
इतर महत्वाच्या बातम्या