Kolhapur Municipal Corporation History: तब्बल एका दशकानंतर कोल्हापूर मनपाच्या निवडणुकीच्या मुहूर्त लागला आहे. त्यामुळे नव्या वर्षात पंचवार्षिक मुदत मुदत संपून बेवारस पडलेल्या कोल्हापूर मनपात नवे कारभारी मिळणार आहेत. गेल्या 20 नोव्हेंबर 2020 पासून कोल्हापूर मनपात प्रशासकराज असून शहरातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. नगरसेवक असताना किमान बोटे मोडता येत होती, शिव्यांची लाखोली सुद्धा वाहिली जात होती. त्यामुळे प्रशासकराजमध्ये किमान शहरामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील आणि शहर विकासाला शिस्त लागेल, बट्टा लागलेली टक्केवारी सुद्धा संपुष्टात येईल, असा भाबडा आशावाद स्थानिक जनतेला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी केलेली राजरोस टक्केवारीने महापालिका पुरती बदनाम झाली आहे. अवघ्या राज्यात कोल्हापूर मनपाच्या टक्केवारीचा डंका वाजला आहे. त्यामुळे नव्या वर्षात पक्षीय पातळीवर निवडणूक होत असून किमान स्वच्छ चारित्र्याचे आणि निष्कलंक उमेदवार निवडीचे उत्तरदायित्व शहरवासियांवर असेल.

Continues below advertisement

कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना केव्हा झाली?

ब्रिटिश कालखंडात 12 ऑक्टोबर 1854 रोजी कोल्हापूरला नगपालिका स्थापन करण्यात आली. नगरपालिकेची स्थापना झाली त्यावर्षी वार्षिक खर्च 300 रुपये इतका होता. त्यावेळी कोल्हापूर शहराची लोकसंख्या 40 हजारांच्या घरात होती. नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर शहराच्या पध्दतशीर रचनेस प्रारंभ झाला. नियोजित पद्धतीने आखणी करुन सुस्थित नागरी जीवनाच्या उभारणीसाठी सुरुवात झाली. 1941 ते 1944 हा कालावधी नगरपालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. या काळात नागरी जीवनाच्या विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण परिवर्तन घडून आलं.

महापालिकेत रुपांतर कधी झालं?

कोल्हापूर नगरपालिकेचं 15 नोव्हेंबर 1972 मध्ये महानगरपालिकेत रूपांतर झाले. ऑगस्ट 1978 मध्ये खऱ्या अर्थाने पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली. या काळात बाबासाहेब कसबेकर (1978 ते 1979), नानासाहेब यादव (979 ते 1980), द. न. कणेरकर (1980), बाबुराव पारखे (1980 ते 1981), प्रा. सुभाष राणे यांनी महापौर या नात्याने कोल्हापूर शहराच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला. नानासाहेब यादव यांच्या काळात भारतात अन्यत्र कुठेही नसलेली स्मशानभूमीत मोफत प्रेत दहन करण्याची यंत्रणा अमलात आली. द. न. कणेरकर यांच्या कारकीर्दीत कावळा नाका येथे रणरागिणी ताराराणीचा पुतळा उभारण्यात आला. 

Continues below advertisement

हद्दवाढ नसल्याने शहराचा विकास खुंटला 

नगरपालिकेचं रुपांतर मनपामध्ये करताना शहराची हद्दवाद करून निर्णय घेतला जातो. मात्र, अजूनही कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. आपमतलबी आणि स्वार्थी राजकारणात आजपर्यंत कोल्हापूर मनपाची हद्दवाढ झाली नसल्याने वाताहत झाली आहे. त्यामुळे नागरी सुविधा देताना प्रचंड ताण तुंटपूंज्या उत्पन्नावर येत आहे. राज्यात गेल्या 50 वर्षात हद्दवाढ न झालेलं कोल्हापूर हे राज्यातील एकमेव शहर असेल अशी स्थिती आहे. गेल्या 50 वर्षात कोल्हापूरची लोकसंख्या 10 पटीनं वाढली आहे, पण अजूनही निर्णय झालेला नाही. प्रस्ताव पे प्रस्ताव झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून हद्दवाढीचा केव्हाही आदेश येणार अशी वातावरण निर्मिती महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, त्याला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. त्यामुळे नव्या सभागृहात तरी आता कोल्हापूरची हद्दवाढ केली जाणार का? हा कळीचा मुद्दा आहे. 

कोल्हापूर मनपातील 2015 मधील पक्षीय बलाबल

कोल्हापूर तसा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मध्यंतरी कालखंडात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने सुद्धा कारभार पाहिला. 2015 मध्ये पहिल्यांदा राज्यात भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडीचा पॅटर्न कोल्हापूर मनपात झाला होता. कोल्हापूर महापालिकेची मुदत नोव्हेंबर 2020 साली संपली आहे. त्यावेळी काँग्रेसने 30 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीने 14 जागा जिंकल्या होत्या. ताराराणी आघाडीने 19 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेनं 4 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येतानाच शिवसेनेच्या सोबतीने सत्ता स्थापन केली होती. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ही किमया करताना भाजप आणि ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. मात्र, गेल्या 10 वर्षापासून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. काँग्रेसला सुद्धा झटका बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढायचा निर्णय घेतला असला, तरी महायुतीसोबत तुल्यबळ लढत होणार आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणात समीकरणे बदलली 

कोल्हापूर महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षांत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिलं आहे. मात्र, राज्यात सत्ताबदलानंतर शहरात समीकरणे बदलली आहेत. जिल्ह्यातील दहाच्या दहा आमदार हे महायुतीचे आहेत. महाविकास आघाडी (शाहू महाराज) व महायुतीकडे (धैर्यशील माने) प्रत्येकी एक खासदार आहे. धनंजय महाडिक राज्यसभेचे खासदार आहेत. विधान परिषदेतील दोन्ही आमदार (सतेज पाटील आणि जयंत आसगावकर) काँग्रेसचे आहेत. नगरपालिका आणि नगपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारताना चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपचे तीन निवडून आले आहेत. दोन काँग्रेस, दोन जनसुराज्य आणि दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे.  

दृष्टीक्षेपात कोल्हापूर महानगरपालिका

● एकूण प्रभागांची संख्या : 20● निवडून द्यावयाच्या नगरसेवकांची संख्या : 81● 1 ते 19 प्रभागात प्रत्येक : 4 नगरसेवक● 20 वा क्रमांक प्रभाग : 5 नगरसेवक● एकूण मतदारांची संख्या : 4,94,711● महिला मतदार संख्या : 2,49,000● पुरुष मतदार संख्या : 2,44,744

● एकूण नगरसेवक : 81● महिला नगरसेवक संख्या : 41● ओबीसी प्रवर्ग : 10● ओबीसी प्रवर्ग महिला : 11● अनुसूचित जाती प्रवर्ग : 05● अनुसूचित जाती महिला : 06● सर्वसाधारण : 24● सर्वसाधारण महिला : 25

● 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात● उमेदवार खर्च मर्यादा (कोल्हापूर) 9 लाख● स. 7.30 ते सायं. 5.30 वेळ मतदान● ऑफलाईन नामनिर्देशनास स्वीकारणार● 1 जुलै 2015 ची मतदार यादी वापरणार

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

  • उमेदवारी दाखल ............... 23 ते 30 डिसेंबर
  • उमेदवार अर्जाची छाननी ............... 31 डिसेंबर 2025
  • उमेदवारी मागे घेण्याची मुदत .... 1 जानेवारी 2026
  • निवडणुका व अंतिम उमेदवार याद्या .... 3 जानेवारी 2026
  • मतदान ............... 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी............ 16 जानेवारी 2026 

इतर महत्वाच्या बातम्या