Kolhapur Loksabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापुरातील लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकीत संभाव्य आणि इच्छूक उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी नाव सुचवल्यानंतर कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्याही नावाची चर्चा झाली होती. यानंतर आता संजय घाटगे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. संजय घाटगे यांनी भूमिका स्पष्ट करताना हसन मुश्रीफ यांच्या पाठबळाशिवाय लोकसभेचं मैदान शक्य नसल्याचेही त्यांनी कबूल केले. 


संजय घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांचे आभार मानले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी नाव सुचवलं तर आपण लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहोत. आपण अनेक वर्ष सक्रिय राजकारण आणि समाजकारणात आहोत. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास आनंदच होईल असं सांगतानाच आमदार हसन मुश्रीफ सोबत असल्याशिवाय ही निवडणूक लढवणं शक्य होणार नसल्याची कबुली सुद्धा माजी आमदार संजय घाटगे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी संजय घाटगे यांचे पुत्र अंबरीश घाटगे यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं. याविषयी विचारलं असता उमेदवारी बाबत वरिष्ठ जो निर्णय तो आम्ही मान्यच करू, असं म्हणत मुलाच्या उमेदवारीला देखील त्यांनी हिरवा कंदील दिला.


राष्ट्रवादीत कोण कोण इच्छुक?


दरम्यान, कोल्हापूरची स्थिती पाहिल्यास महाविकास आघाडी तसेच शिवसेना आणि भाजपकडे कोणताही सक्षम पर्याय नसल्याचे चित्र आहे. या पक्षांकडे कोणताही ठोस उमेदवार नाही. मात्र, या सर्वच पक्षांकडून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तथापी, आजवरचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा इतिहास पाहता दोन्ही पक्षांनी आयात करून उमेदवार लादू नये, अशीच भावना राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारीसाठी गळ घालण्यात आली होती. मात्र, त्यांची राज्याच्या राजकारणातील स्थिती पाहता त्यांनी लोकसभेसाठी कोणताही हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यांनी इतर नावे मात्र सुचवली.


संजय घाटगे यांच्यासह व्ही. बी. पाटील, के. पी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडीकडून चेतन नरके हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांना कोणताही ठोस शब्द आतापर्यंत देण्यात आलेला नाही. त्यांची संजय राऊत यांनी भेट घेतली होती. अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली. मात्र, त्यांना फक्त विचार केला जाईल त्याच्या पलीकडे कुठलाही शब्द अजून देण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याही नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्या राजवाड्यावर जाऊन झालेल्या गाठीभेटी बोलक्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या