कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून रविवारी राज्यभर मेळावे घेण्यात आले. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे प्रचाराचे रणशिंग सुद्धा फुंकण्यात आले. महायुतीचा कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सुद्धा मेळावा पार पडला. यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबिटकर (Prakash Abitkar) सोडून सर्वच महायुतीच्या नेत्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलमध्ये हा मेळावा पार पडला.


कोल्हापुरातील दोन्ही जागा शिंदे गटाला 


या मेळाव्यामध्ये बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभेसह (kolhapur lok sabha constituency) हातकणंगले लोकसभेची (hatkanangale lok sabha constituency) जागा शिंदे गटाला सोडण्यात येईल, याबाबत निर्णय झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हापुरातील दोन जागा शिंदे गटाला मिळणार यावर जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भाजपने कोल्हापूर लोकसभेसाठी चांगलीच चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता ही जागा आपण शिंदे गटासाठी राहणार की ऐनवेळी यामध्ये काही बदल होणार याबाबत मात्र अजूनही कोणतीही शाश्वती नाही. 


मात्र, मुश्रीफ यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन पाहता या जागा शिंदे गटाला सुटतील, असेच चित्र सध्या आहे. कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटात आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार? याची चर्चा रंगली आहे. कोल्हापूर लोकसभेला गेल्या चार निवडणुकांपासून ज्याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला, त्याचाच पुढील निवडणुकीत प्रचार अशीच स्थिती झाली आहे.


ज्यानं हरवलं त्याचाच प्रचार करण्याची वेळ!


2004 मध्ये पहिल्यांदा धनंजय महाडिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पहिल्यांदा सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला. यानंतर 2009 मध्ये महाडिक यांनी सदाशिव मंडलिक यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत संभाजीराजे यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्ये धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना पराभूत करत पहिल्यांदा लोकसभेमध्ये प्रवेश केला. यानंतर 2019 मध्ये आमचं ठरलंय म्हणत महाडिकांविरोधात सतेज पाटील यांनी एकहाती प्रचार करत संजय मंडलिक यांच्यासाठी विजय खेचून आणला. त्यामुळे धनंजय महाडिक यांना पराभूत व्हावं लागलं होतं. 


आता यावर्षी होणाऱ्या लोकसभे निवडणुकीसाठी सुद्धा याच ज्यांनी पराभूत केलं त्यांचाच प्रचार धनंजय महाडिक यांना करावा लागणार आहे अशी स्थिती एकंदरीत दिसत आहे. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक हेच महायुतीचे उमेदवार असतील असं सध्याचे चित्र आहे. उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास धनंजय महाडिक यांना महायुतीची जबाबदारी म्हणून संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी रान करावं लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून उमेदवार कोणता याकडेही अजून निश्चिती नाही. 


कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस सुद्धा इच्छुक आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली आत्ताची ताकद पाहिल्यास काँग्रेसची ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याच्याकडेही लक्ष असेल. काँग्रेसकडून बाजीराव खाडे इच्छुक आहेत. शरद पवार गटाकडून व्ही. बी. पाटील इच्छुक आहेत, तर दुसरीकडे चेतन नरके यांनी सर्वच पक्षांकडून उमेदवारी मागितली असली तरी गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल असा दावा केला आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेसाठी अजूनही उमेदवार निश्चित होण्यासाठी काही वाट पाहावी लागणार आहे.