Kolhapur Rain : कोल्हापुरातील खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. नाटक पाहायला आलेल्या या दोन महिला या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. नंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. पण त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. अश्विनी यादव असे मृत महिलेचे नाव असून संध्या तेली ही महिला जखमी आहे.
कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक कुस्तीचे मैदान असलेल्या खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून दोन महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना आज संध्याकाळी घडली होती. कोल्हापूर महानगरपालिके अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत दुर्दैवानं एका महिलेचा मृत्यू झाला आहे..
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर आहे. मंगळवारी अतिपावसामुळे संध्याकाळच्या सुमारास खासबाग मैदानाच्या पूर्वेकडील भली मोठी भिंत कोसळली. 20 फूट उंच आणि आणि 50 फूट लांब असलेली ही प्रेक्षक गॅलरीची भिंत कोसळली. त्याच वेळी या दोन महिला लघुशंकेसाठी भिंतीच्या कडेला गेल्या होत्या. भिंत पडल्यानंतर दोघीही त्या ढिगार्याखाली अडकल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दोघींनाही बाहेर काढले. मात्र त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.
उद्यापासून 28 गावांतील शाळा बंद
कोल्हापुरातील संभाव्य पुराच्या पहिल्या टप्प्यात येणाऱ्या 28 गावांतील शाळा बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी ही माहिती दिली. संबंधित गावातील शाळेत निवारा केंद्र उभारली जाणार आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पंचगंगेची पाणी पातळी स्थिर
पंचगंगा नदीची पाणी पातळी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून स्थिर आहे. सध्या पंचगंगा ही 40 फूट 4 इंचावरून वाहत आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसतंय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना तसेच कोल्हापूर शहरातील सकल भागातील रहिवाशांना हा दिलासा म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा खूप कमी पाऊस जिल्ह्यामध्ये झाला. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर झाली आहे. मात्र जिल्ह्यातील 83 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. शिवाय राधानगरी धरणामध्ये देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात.
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीबाबत कोणत्याही अफवेवर कोल्हापूरच्या नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तसंच नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा: