कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघ पिंजून काढलेल्या आणि महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इटली आणि स्पेनच्या प्रवासासाठी 14 दिवसांची जनतेच्या दरबारातून रजा घेतली आहे. याबाबत त्यांनी जनतेकडे 14 दिवसांची रजा मागितली होता. सूचनेचा फलक त्यांनी कागल येथील निवासस्थानाच्या बाहेर लावल्याने त्याचे चांगलीच चर्चा रंगली आहे.


कागल आणि हसन मुश्रीफ असे वेगळेच समीकरण आतापर्यंत राहिलं आहे. कागलमधील लोकांना तसेच मतदारसंघातील लोकांना वैद्यकीय सेवा देण्यामध्ये मुश्रीफ नेहमीच आघाडीवर असतात. त्यामुळे पहाटेपासूनच वैद्यकीय मदतीसाठी लोकांची निवासस्थानी रांग लागलेली असते. त्यामुळे लोकांचे अडचण होऊ नये, यासाठी त्यांनी दरवाजासमोर सूचना फलक लावत 14 दिवसांची रजा मंजूर केल्याबद्दल आभार मानले आहेत. 






काय म्हटलं आहे सूचना फलकावर? 


4 जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा...पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील याची खात्री व्यक्त केलेली आहे. दरम्यान येणारा महिनाभर संपूर्ण देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कालावधीमध्ये मतदारसंघ, जिल्हा, राज्य व मंत्रालयामध्ये व्यक्तिगत व विकासाची कामे होत नाहीत. म्हणून केडीसीसी बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली व स्पेनचा दौरा आयोजित केला आहे. वैद्यकीय सेवा सुरूच राहील. 


10 मे ते 24 मे या कालावधीत माझा मोबाईल सुरूच राहील. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच, या काळात वैद्यकीय सेवाही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईमधील मंत्रालयासमोर निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केली आहे. मला 14 दिवसांची रजा आपण मंजूर केली त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. उन्हाळा प्रचंड आहे तरी सर्वांनी आपली काळजी घ्यावी, आपला विश्वासू हसन मुश्रीफ असेही शेवटी म्हटले आहे.




कोल्हापुरात चुरशीने मतदान 


दरम्यान, मंगळवारी कोल्हापूर लोकसभेसाठी राज्यातील सर्वाधिक चुरशीने मतदान झाले. कोल्हापूर लोकसभेसाठी 71 टक्के मतदान झालं आहे. करवीर तालुक्यामध्ये सर्वाधिक 80 टक्क्यांच्या घरात मतदानाची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट लढत आहे. निकाल 4 जून रोजी असणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या