Deepak Kesarkar: कोल्हापुरात (Kolhapur News) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावरून शिंदे गटामध्ये  कुरबुरी सुरु असतानाच आता थेट पालकमंत्री दीपक केसरकरांविरोधात (BJP on Deepak Kesarkar) भाजपने हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री पर्यटनमंत्री असल्यासारखे वागत असल्याची टीका भाजपने केली आहे. त्यांच्यावर निष्क्रियपणाचा आरोपही भाजपने केला आहे. सध्याचे पालकमंत्री पर्यटनमंत्री असल्यासारखे वागत असून त्यांच्या निष्क्रियपणामुळे कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी सारख्या पदांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे भाजप शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही पदे त्वरित जाहीर करावी अशी मागणी करणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी पदांच्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत नाराजी व्यक्त करत भाजपने निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे विचारणा केली. 


भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांच्याकडे प्रलंबित नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी या विषयात लक्ष न दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.


सुधारित अध्यादेशानुसार नव्याने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा अधिकार पालकमंत्री व स्थानिक प्रशासनाला आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांचे पत्र मिळताच नियुक्त्या तत्काळ करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भाजप शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही पदे त्वरित जाहीर करावी, अशी मागणी करणार आहे.


कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीपद बहाल करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न नेहमीच सत्ताधाऱ्यांचा असतो. परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याविषयात लक्ष न दिल्याने भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेऊन प्रलंबित नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित करून या प्रक्रियेतील वेळकाढूपणाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. 


दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावरून कोल्हापुरात शिंदे गटात कुरबुरी सुरु असल्याची चर्चा आहे. या पदासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके फिल्डींग लावत असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर कुरबुरी सुरु झाल्या आहेत. मात्र, नरके यांनी दावा खोडून काढताना असे कोणतेही प्रयत्न सुरु नसल्याचे म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या