Kolhapur District Gram Panchayat Election Result : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींचा निकाल स्पष्ट झाला असून महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली असून तब्बल 198 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. महाविकास  आघाडीने गावगाड्यावर सरशी केली असली, तरी भाजप आणि शिंदे गटानेही दमदार प्रवेश केला आहे. (Kolhapur District Gram Panchayat Election Result) ग्रामपंचायतींच्या निवडणूका या पूर्णत: स्थानिक पातळीवर झाल्या असल्या, तरी अनेकांकडून आपल्याच गटाकडून सर्वाधिक पंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभा डोळ्यासमोर  जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व खासदार, स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीसाठी पडद्याआड राहून चांगलीच रसद पुरवली होती. 


दरम्यान, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांत पूर्वीच्याच लोकांना सरपंच म्हणून स्वीकारले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जाहीर झालेल्या 429 पैकी 198 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून 231 ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना सत्ता कायम ठेवण्यात यश आलं आहे. 


निकालामध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारत वर्चस्व राखले आहे. भाजप- शिंदे गटानेही जोरदार मुसुंडी मारली आहे. जिल्ह्यात 474 पैकी 45 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे 429 गावांसाठी निवडणूक पार पडली. दरम्यान, महाविकास आघाडीचे वर्चस्व सर्वच तालुक्यात दिसून आले. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवून सत्ता मिळवलेल्यांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच आहेत. यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), जनसुराज्य, शेकाप सरपंचांचाही समावेश आहे. (Kolhapur District Gram Panchayat Election Result)


कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षीय बलाबल 



  • काँग्रेस 54

  • राष्ट्रवादी 17

  • शिवसेना ठाकरे गट 28

  • भाजप 14 

  • शिंदे गट 6

  • राष्ट्रवादी आणि काँग्रेस (एकत्र) 10

  • स्थानिक आघाडी 19

  • सर्वपक्षीय आघाडी 92

  • वैयक्तिक गट 12 


हसन मुश्रीफ गटाला कागल तालुक्यात धक्का


कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकालाची नोंद गटातटाचे सर्वाधिक राजकारण असणाऱ्या कागल तालुक्यात झाली आहे. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना या निवडणुकीतून धक्का बसला आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 15 गावात सतांतर झाले आहे. दुसरीकडे 11 गावचे कारभारी सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. तालुक्यात आमदार हसन मुश्रीफ गटाचे 7, खासदार संजय मंडलिक गटाचे 7, समरजितसिंह घाटगे गटाचे 6, माजी आमदार संजय घाटगे गटाचे 4 तर प्रविणसिंह पाटील गटाचे 2 ठिकाणांवर थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवार विजयी झाले. समरजितसिंह घाटगे गटाने मागील निवडणुकीतील तीनवरून सहा ठिकाणी सरपंचपदी यश मिळवलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या